हे कार्य जसे स्वहिताचे आहे तसेच हे कार्य राष्ट्रहिताचेही आहे. चातुर्वर्णातर्गत अस्पृश्यता नाहिशी झाल्याशिवाय हिंदू समाजाचा तरणोपाय नाही. परस्परांच्या जीवनकलहात तरणोपाय म्हणून कोणत्याही समाजास जी साधनसामग्री अवश्यमेव लागते त्या साधनसामग्रीत समाजाची नीतिमत्ता हे एक मोठेच साधन आहे. एवढी गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल की, ज्या समाजाची नीतिमत्ता अशा प्रकारची आहे की, ज्या गोष्टीमुळे समाज एकवट होत [नाही ] त्या गोष्टी स्त्युत्य धरल्या जातात व ज्यामुळे तो एकवट होऊ शकतो अशा गोष्टी निषिद्ध मानिल्या जातात, त्या समाजास जीवनकलहात हार खाली लागणार आहे. उलटपक्षी ज्या समाजाची नीतिमत्ता अशा प्रकारची आहे की, [ज्या ] कारणामुळे समाज एकवट होतो ती कारणे स्त्युत्य धरली जातात व ज्या कारणामुळे समाज दुभंग होतो ती कारणे निंद्य मानली जातात [त्या ] समाजास जीवनकलहात यशप्राप्ती झाल्याशिवाय राहाणार नाही. तोच न्याय हिंदू समाजव्यवस्थेस लागू करणे प्राप्त आहे. चातुर्वर्ण्यव्यवस्था ही लोकविग्रहकारी व्यवस्था आहे व एकवर्णी व्यवस्था लोकसंग्रहकारी व्यवस्था आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसत असता जेणे विग्रह होतो अशा व्यवस्थेचा उदो उदो [करणाऱ्या ] हिंदू समाजाला वारंवार हार खावी लागली तर त्यात नवल [काय ] [? ] ही होत
असलेली अनवरथा जर टाळावयाची असेल तर चातुर्वर्ण्याची चौकट [मोडून ] [तिचा ] एक वर्ण केलाच पाहिजे.-- (पृ. क्र. १२०)
-- डॉ. बाबासाहेब आंबेडकर