हिंदुस्थानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज रूढ आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी ग्हटले आहे की, हिंदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्त्वज्ञान, धर्म व अध्यात्म याविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून, राजकारणापासून साफ अलिप्त होते. असेही म्हणतात की, हिदी जीवन व समाज एका ठरावीक पोलादी चौकटीमध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले की इतिहासकाराचे काम संपले ! हिंदुस्थानचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानाहून अगदी निराळे बनले आहे. ह्या अभ्यासात मला आढळून आले आहे की, जगात कुठल्याही देशात हिंदुस्थानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्थान हा बहुधा एकच देश असा आहे की जेथे जगात दुसरीकडे कोठेही दिसली नाही अशी क्रांती घडून
आली होती.
हिदी इतिहासाच्या विद्यार्थ्यानी एक मूलभूत गोष्ट-ज्याचा इतिहासकारांना साफ विसर पडलेला दिसतो-नेहमी ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे प्राचीन हिंदुस्थानात घडलेला बौद्ध व ब्राह्मण यामधील लढा. याचा इतिहास काही प्रोफेसरांनी म्हटल्याप्रमाणे हा केवळ एखादा पंथामधला मामुली लढा नव्हता. सत्य म्हणजे काय यासाठी तो लढा होता. -- (पृ. क्र. ४६१)
--- डॉ. बाबासाहेब आंबेडकर