द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने
या खंडाची प्रथम आवृत्ती ही १५ ऑक्टोबर २००२ ला प्रकाशित झाली, तेव्हापासून या ग्रंथाची मागणी जनतेकडून सातत्याने होत आहे, ही बाब लक्षात घेऊन या खंडाची द्वितीय आवृत्ती प्रकाशित करावी, असे समितीने ठरविले व त्यानुसार ही द्वितीय आवृत्ती आपल्यासमोर येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन हे बहुसंख्येने इंग्रजी भाषेत आहे. मराठीपेक्षाही त्यांचे सर्व महत्त्वाचे ग्रंथ हे इंग्रजी भाषेत लिहिलेले आहेत, त्यामुळे बाबासाहेबांच्या ग्रंथाला जगभरातील वाचकवर्ग लाभला; परंतु इंग्रजी भाषेशी ज्याचे फारशे देणे-घेणे नाही अशा मराठी भाषकाला मात्र ते समजून घेणे दुरापास्त होते. बाबासाहेबांची चळवळ ही जिवंत होती व या चळवळीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून बाबासाहेब अनेकदा लोकांना मार्गदर्शन करीत असत. सभा ही त्या काळातील लोकप्रबोधन व लोकजागृतीचे मोठे माध्यम होते. भाषण हे त्यातील सर्वात महत्त्वाचे माध्यम होते. बाबासाहेब हे जसे लेखक म्हणून ओळखले जात तेवढेच ते वक्ते/ व्याख्याते म्हणूनही लोकप्रिय होते. 'पुढारी' हा एक रोल त्यांनी केला. पुढाऱ्याच्या शब्दाला त्याकाळी वजन होते. त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त झालेला विचार त्यांच्या अनुयायांचा एक जीवनमार्ग ठरत होता. हे सारे प्रत्यक्ष घडत होते त्याचे माध्यम होते भाषण- आणि ही भाषणे मराठी भाषेत होत होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढे ज्ञान त्यांच्या ग्रंथात मांडले होते तेवढेच ते भाषणकृतीतून आपल्या जनतेसाठी मराठीतून व्यक्त केले आहे. या भाषणात प्रश्नांची केलेली मांडणी, ती सोडविण्यासाठी करावयाचे उपाय व त्यासाठी करावी लागणारी कृती असा त्रिवेणी संगम झाला आहे. हे एकप्रकारचे विलक्षण असे नाट्य आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या या तीनशे एकावन्न भाषणांतून आल्याशिवाय राहत नाही. या भाषणाचा हा ऐवज एकत्र करून संपादक मंडळीने आपल्यासमोर ठेवला आहे. ही धनसंपत्ती आहे, हे ज्ञानभांडार या खंडाद्वारे मराठी वाचकांसमोर ठेवले आहे.
या खंडाचे तीन भाग कालानुक्रमे केले आहेत. पहिल्या भागात इ. स. १९२० ते १९३६ हा काळ घेतला आहे. एकूण ९६ भाषणांचे संकलन या भागात केले