: फुले शाहू आंबेडकर ' ही विचारधारा महाराष्ट्रात शिरोधार्य मानली जाते. राजर्षी शाहूंचे विचार, भाषणे, पत्रव्यवहार, शासनादेश यांचे प्रकाशन करण्याचा श्री.हरी नरके यांनी दिलेला प्रस्ताव आम्ही स्विकारला असून त्याचेही काम लवकरच सुरु होईल. भारत सरकारने डॉ.आंबेड़करांच्या साहित्याचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर करुन ते ग्रंथरुपाने प्रकाशित करण्यासाठी डॉ.आंबेडकर फौडेशनची १९९१ मध्ये स्थापना केली आहे. या फौंडेशनला महाराष्ट्र शासनाने हिंदी, बंगाली, तेलगू, कन्नड आदी भारतीय भाषांतील कामांसाठी सहकार्य केले आहे. मराठी अनुवादाच्या कामासाठी फौंडेशनने महाराष्ट्र शासनाला अनुदान देऊ केले असून त्यासाठी ग्रंथ समिती कायमस्वरुपी असण्याची गरज आहे. या समितीला स्वायत्तता दिल्यास ती स्वयंपूर्ण आणि गतिमान होऊ शकेल हे लक्षात घेऊन आम्ही त्यादृष्टीने पावले टाकीत आहोत. मराठी अनुवादाला खूप मागणी असूनही समितीकडील अत्यल्प मनुष्यबळ व समितीचे हंगामी स्वरुप यासारख्या असंख्य अडचणीमुळे हे काम खूपच मागे राहिले आहे याची आम्हाला जाणिव आहे. समितीकडे एकही संशोधन सहाय्यक, संपादन सहाय्यक वा मुद्रित शोधक नसल्यामुळे या सा-याच कामांचा बोजा सदस्य सचिवांवर पडतो. पुढील खंडांची छपाई, अनुवादांचे कार्य व समितीचे अन्य नियोजित प्रकल्प या सा-यांमध्ये सध्यातरी छपाईच्या अवस्थेत असलेल्या अनुवादांच्या खंडांना अग्रक्रम देण्याचा समितीचा निर्णय आहे. समिती कायमस्वरुपी आणि स्वायत्त झाल्यानंतर बरीच कामे बाहेरुन करुन घेण्याचाही पर्याय उपलब्ध असेल ब त्यामुळे प्रलंबित कामांना गती देता येईल.
६ डिसेंबर २००६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला ५० वर्ष पूर्ण होत आहे. त्याआधी अधिकाधिक मराठीतील अनुवाद खंड प्रकाशित करण्याचा आमचा सर्वतोपरी प्रयत्न राहील.
मराठीतील खंड १८ला वाचकांचे अलोट प्रेम मिळाले. तसेच या एकोणीस ब वीस खंडांना मिळेल असा मला विश्वास वाटतो.
दिलिप वळसे पाटील
मंत्री, उच्च ब तंत्र शिक्षण,वैद्यकीय
शिक्षण, आणि उर्जा, तथा अध्यक्ष
डो. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने
प्रकाशन समिती.
(बारा)