'' हिंदु धर्मीयांत असलेली ही विषमता जितकी अनुपम आहे तितकीच ती निदास्पदही आहे. कारण विषमतेनुरूप होणाऱया परस्परांच्या व्यवहाराचें स्वरुप हिदुधर्माच्या शीलाला शोभण्यासारखें खास नाहीं. हिंदुधर्मात समाविष्ट होणाऱ्या जाती उच्चनीच भावनेने प्रेरित झाल्या आहेत हें उघड आहे, हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय. पण लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं या मनोर्यास शिडी नाही ; आणि म्हणून एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यांत ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यांत त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला
इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या
मजल्यातला माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही. उघड भाषेत बोलावयाचे म्हणजे जाती जातीत असलेल्या या उच्चनीच भावना गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत असे नाही. उच्च जातीत जन्मलेला मग तो कितीही अवगुणी असो तो उच्च म्हणावयाचा ; तसेच नीच जातींत जन्मलेला मग तो कितीही गुणी असो, तो नीचच रहावयाचा. दुसरे असें कीं, परस्परांत रोटी-बेटी व्यवहार होत नसल्यामुळे दर एक जात या जिव्हाळ्याच्या संबंधात स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्यव्यवहार अनियंत्रित असा नाही. कांहीचा व्यवहार दारापर्यंतच होतो व कांही जाती तर अस्पृश्य आहेत, म्हणजे त्या जातीतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातीतील माणसास विटाळ होतो. विटाळामुळे या बहिष्कृत जातींशी इतर जातीच्या लोकांशी क्वचितच व्यवहार होतो. रोटी-बेटी व्यवहाराच्या अभावी कायम झालेल्या परकेपणांत स्पृश्यास्पृश्य भावनेनें इतकी भर टाकली आहे की, या जाती हिंदु समाजात असून समाजाबाहेर आहेत असेंच म्हटलें पाहिजे. या व्यवस्थेमुळे हिंदुधर्मीयांचे ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात. तसेंच या विषमतेच्या परिणामाकडे लक्ष दिलें तर असे दिसून येईल कीं, तिच्या पायी विविध जातीवर विविध परिणाम झाले आहेत.