'' या राजकारणापासून समाजकारणाकडे वळतांना सहारा वाळवंट सोडून एकाद्या हिरवळींत प्रवेश केल्याचा भास होतो. हल्लीचे राजकारण हा शुद्ध पोरखेळ होऊन बसला आहे. सामाजिक चळवळीची परिस्थिती निराशाजनक
असली तरी इतकी निराशाजनक नाही. उपमा द्यायची असल्यास असें
म्हणता येईल कीं राजकीय चळवळ अजीर्ण होऊन मरत आहे तर सामाजिक चळवळ, मरत असली तर, भुकेमुळे मरत आहे. वास्तविक ती मरत नाही. तिला मारण्याचें अनेक प्रयत्न झाले व आजही होत आहेत. टिळक- चिपळुणकरांपासून तो परवां काशीला जमलेल्या ब्राह्मणांपर्यंत या प्रयत्नांची परंपरा येऊन पोंचते. टिळक-चिपळुणकरांनी सामाजिक सुधारणेची चळवळ मारण्यासाठी कसेकसे प्रयत्न केले ते महाराष्ट्राच्या इतिहासात नमूद आहे. त्यांच्या घंटाबडव्यांनी हिंदुसंघटनाच्या नांवाखाली सामाजिक अंतःशुद्धीच्या चळवळीला गुदमरण्याची कसकशी कारस्थानें चालवली आहेत तें सर्वांना माहित आहे. काशीच्या ब्राह्मणर्समेलनानें समाजसुधारणेच्या मुळावरच कुऱ्हाड कशी घातली हेही सर्वाना विदीत झालें आहे. हे प्रयत्न निराळ्या वेळी, निराळ्या स्थळीं व निराळ्या लोकांकडून झाले. पण सुधारणेची हिंसा हें त्यांचे एकच ध्येय आहे. पण सुधारणेची चळवळ या सर्व प्रयत्नांना पुरुन उरली आहे. तिच्या सैन्यांत, तिच्या विरोधकांच्या अपेक्षेबाहेर रिक्रुटभरती होत आहे. समाजसुधारणेशिवाय राजकीय चळवळीचीही धडगत नाही हे आतां सर्वाना पटूं लागलें आहे. “