२०-७-१९२७ महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप निराधार - Page 101

महार जातीवरील आप्पलपोटेपणाचा आरोप निराधार ५९

सुशिक्षित व्हा म्हणजे अस्पृश्यता आपोआप जाईल असे स्पृश्य वर्गातील लोक आपणास SPAT; TT नुसते सुशिक्षित होण्याने अस्पृश्यता निवारण होईल असे मानणे सर्वथैव चुकीचे आहे. मी एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. मी अस्पृश्य आहे हे जोपर्यंत मुंबईच्या माझ्या चेंबर नजिक असणार्‍या भटाला, खानावळवाल्याला माहीत नव्हते तोपर्यंत तो मला त्याच्या कपबशीतून चहा आणि भजी पुरवीत असे; पण परवा मी अस्पृश्य आहे, हे जेव्हा त्याला एका गुजराती वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या फोटोवरून कळले तेव्हापासून तो मला काचेच्या पेल्यातून चहा देऊ लागला. त्याला असे करण्यास अर्थात एका स्पृश्य वर्गातील कारकुनाने चिथावले होते. अशी स्थिती जेथे आहे तेथे सशिक्षित झाल्यावर अस्पृश्यता आपोआप निघून जाईल असे म्हणणे कसे चुकीचे आहे हे दिसून येईल.

जर आम्ही आता चढाईचे धोरण स्वीकारले नाही तर आमचा निभाव लागणे शक्य नाही. आम्ही तुडविले जात आहोत याचे कारण आपणास आपल्या अपमानाचा राग येत नाही हेच होय. अन्यायाचा प्रतिकार आमच्या पूर्वजांनी केला नाही. ही त्यांची मोठी चूक होय. आता अपमान सहन करण्याचे दिवस संपले हे आपण आपणात संघटना करून लोकांच्या नजरेत आणले पाहिजे.

यापुढे ज्या ज्या अस्पृश्यांच्या परिषदा भरविण्यात येतील त्यांचे पर्यवसान देवळातून प्रवेश करणे, सार्वजनिक तळ्यात पाणी पिणे वगैरे गोष्टीमध्येच झाले पाहिजे असे माझे मत आहे. अस्पृश्यांची सभा आम्ही यंदा आळंदीस भरवणार आहोत. त्यावेळी काही झाले तरी तेथील देवालयात आम्ही प्रवेश करणारच. असे केले तरच आमचा कार्यभाग तडीस जाईल.

डॉ. आंबेडकर यांचे वरील आशयाचे भाषण झाल्यावर डॉ. साळुंखे यांनी थोडे भाषण करून गुजरातेतील अस्पृश्यांची महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या चळवळीस पूर्ण सहानुभूती आहे अशी ग्वाही दिली. नंतर वऱ्हाडातील रा. पंढरीनाथ पाटील यांचे भाषण चालू असताना मांगवाड्यात कोणी एक आजारी इसम मयत झाल्याकारणाने त्याच्या निधनानिमित्त सभेचे काम बंद ठेवण्यात आले.