MR/Khand_18_1 - Page 15

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : २० ऑगस्ट २००२.

महाराष्ट्र

प्रस्तावना

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व भाषणे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फ १८ व्या खंडाच्या रूपाने प्रसिद्ध होत आहेत, याचा मला अतिशय आनंद वाटतो. हा ग्रंथ संशोधकांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. १८ व्या खंडातील डॉ. आंबेडकरांची सर्व भाषणे मराठीमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी ही भाषणे अवश्य वाचावीत. या भाषणांवरून डॉ. आंबेडकरांच्या महान व्यक्तिमत्वाची कल्पना येईल.

डॉ. आंबेडकरांनी देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय इत्यादी विविध विषयांवर वेळोवेळी भाषणे दिली. कोणताही विषय असो, डॉ. आंबेडकरांनी त्या विषयाच्या संदर्भात मूलभूत पण वस्तूनिष्ठ विचार मांडलेले आढळून येतात. दलित, कामगार, शेतकरी, महिला या साऱ्यांसंदभति त्यांनी मूलगामी विचार मांडले. ते केवळ विचार मांडूनच थांबले नाहीत तर ते प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टिने त्यांनी उपाय देखील सांगितले. तरूण पिढीने ही भाषणे वाचावीत, असा माझा आग्रह आहे. २१ व्या शतकात आपल्या देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचे असेल, तर डॉ. आंबेडकरांच्या विचारांशिवाय पर्याय नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विसाव्या शतकातील महान समाजक्रांतीकारक नेते आणि विचारवंत होते. डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजाला विचारांची एक नवी दिशा दिली. वर्षानुवर्षे रूढी, परंपरांच्या निद्रेत असलेल्या भारतीय समाजाला जागे करण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांनी देशातील दलित, पिडीत, शोषित बहुजन समाजाला जागृत करून त्यांना मानवी अधिकार मिळवून दिले.त्यांचे हे क्रांतीकारी कार्य रूढीग्रस्त समाजाला पचणारे नव्हते, त्यामुळे त्याना खूप विरोध सहन करावा लागला. तरी देखील त्यांनी विरोधाची तमा न बाळगता आपले आंदोलन पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रवादाची संकल्पना मांडून देशातील जनतेला खऱ्या राष्ट्रवादाची ओळख करून दिली. राष्ट्रापेक्षा नेते किंवा लोक महान नाहीत, असे त्यांचे स्पष्ट मत होते. मुंबई विधी मंडळात बोलताना डॉ. आंबेडकर ४ एप्रिल १९३८ रोजी म्हणाले होते की, '' आपण प्रथम भारतीय, शेवटीही भारतीय, भारतीय पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी. हीच वृत्ती खऱ्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला पोषक आहे. “.