२५-१२-१९२७ महाड सत्याग्रह परिषद - Page 179

महाड सत्याग्रह परिषद १३७

गेलेल्या या लोकांनी ही प्रचंड मिरवणूक बाजारपेठेतून चाललेली पाहून सर्व महाड शहर गांगरून गेले. असल्याप्रकारची मिरवणूक पाहण्याचा महाड शहराला हा पहिलाच प्रसंग होय. पंचम जार्ज की जय, महाड सत्याग्रहकी जय, गांधीकी जय, आगरकर की जय, लोकहितवादी की जय, एकनाथ महाराज की जय वगैरे जयघोषाने सर्व शहर दणाणून गेले होते. मिरवणूक बाजारपेठेतून निघून चवदार तळ्याच्या कोपऱ्यावर आली व तेथे मिरवणूक उभी फोडण्यात येऊन अर्धी मिरवणूक तळ्याच्या एका बाजूने व अर्धी मिरवणूक तळ्याच्या दुसऱ्या बाजूने नेऊन तळ्याच्या एका कोपऱ्यावर दोहीची मिळणी करून पुढे एक होऊन मंडपाजवळ आली. अशारीतीने तळ्याच्या चारही बाजूला वेढा देण्यात आला होता. हा विलक्षण देखावा पाहून आता तळे घ्यावयाचे बाकी काय राहिले ! असे केविलवाणे उद्‌गार गावातील लोकांनी काढल्याचे ऐक्‌ येत होते आणि तसे उद्गार निघणे अगदी शक्य होते. कारण खांद्यावर काठ्या घेऊन चालत येत असलेल्या या मिरवणुकीचा देखावा शिवाजीच्या काळच्या मावळ्यांच्या सैन्याची आठवण करून देत होता. मिरवणूक इतकी मोठी होती की, आघाडीचे लोक मंडपाजवळ परत आले तरी पिछाडीचे लोक मंडपाजवळच होते. . मिरवणूक काही मंद गतीने चालत नव्हती, तरी पण साडेदहा वाजता निघालेली मिरवणूक संपण्यास १२ वाजले. यावरून मिरवणूक किती मोठी होती याची कल्पना करता येईल.

मिरवणूक संपून मंडळी परत आल्यानंतर पुन्हा परिषदेस सुरवात झाली व रा. शिवतरकर यांनी खालील ठराव सभेपुढे मांडला :

ही परिषद यशस्वी करण्याचे कामी ज्या अस्पृश्येतर सद्गृहस्थांनी मदत केली त्यांचे व विशेषतः खालील सद्गृहस्थांचे ही सभा कृतज्ञतापूर्वक आभार मानीत आहे. (१) अ. वि. चित्रे, (२) सुरेंद्रनाथ टिपणीस, (३) फत्तेखानसाहेब मुठोलीकर, (४) शांताराम रघुनाथ पोतनीस, (५) केशवराव देशपांडे, (६) ग. नि. सहस्त्रबुद्धे. या ठरावावर श्रीयुत पांडुरंग नाथूजी राजभोज, श्रीयुत मोरे, श्रीयुत वनमाळी वगैरे मंडळींनी चरित्रात्मक भाषणे केली व हा आभार प्रदर्शनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात पसार झाला. त्यावर रा. अनंतराव चित्रे व सहस्त्रबुद्धे यांनी उत्तरादाखल भाषणे केल्यानंतर डॉ. आंबेडकर यांनी सांगितले की, ' जरी सभेचा कार्यक्रम आता संपला आहे तरी इतर काही महत्त्वाच्या गोष्टीची चर्चा करणे राहिले आहे व त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याकारणाने त्याचा विचार केल्याशिवाय ही परिषद शेवटास गेली असे मला म्हणता यावयाचे नाही.