अस्पृश्यतेचा उगम जाती भेदातूनच १५३
पाषाणालाही पाझर फोडणाऱ्या दीनावस्थेत व नम्रतेत आम्ही दिवस काढले ना ? आता तरी कृपा करून नम्रतेचे व विनयाचे पाठ आम्हाला देऊ नका. ते आता उच्च वर्णीयांनाच शिकवा. विनंत्या, अर्ज, शिष्टमंडळे यांच्या साहाय्याने गमाविलेली स्वातंत्र्ये व दडपलेले हक्क मिळणे शक्य असते तर नेमस्त पक्षाचे लोक आतापर्यंत हिंदुस्थानचे राजे बनले असते व हिंदुंची धर्मसत्ता अस्पृश्यांच्या घरी पाणी भरू लागली असती ! उद्दामपणाची आम्हाला सवय आहे अगर चढेलपणाचे चाळे करण्याची आम्हाला हौस आहे असे थोडेच आहे । दिवसभर काबाडकष्ट करून पोटासाठी दोन घास कसे मिळविता येतील ही विवंचना आमची रोजची सोबतीण ; पण भाकरीपेक्षा माणुसकी श्रेष्ठ म्हणून आम्ही या यातायातीत पडलो. कारण ठोठावल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत आणि हिसकावून घेतल्याशिवाय माणुसकीचे आमचे साधे हक्कही तुमच्या हातून सुटत
नाहीत.
तिसऱ्या आक्षेपाला उत्तर देताना प्रारंभी मी आपल्याला एवढे सांगू इच्छितो की, आमची अस्पृश्यता निवारणाची चळवळ फक्त अस्पृश्य वर्गापुरतीच नाही. तर सगळ्या हिंदू समाजातील या जन्मजात अस्पृश्यतेचा नाश करणे हा आमच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे. तो साध्य होणे सोपी गोष्ट नाही. याची आम्हाला अगदी पुरेपूर जाणीव आहे. पण हिंदू समाजातील या रोगाचा नायनाट करण्याची जर कोणाला खरी तळमळ लागून राहणे शक्य असेल तर ती आम्हा अस्पृश्यांनाच होय. ब्राह्मणव्यतिरिक्त इतर सर्व जातींना या सामाजिक व धार्मिक अस्पृश्यतेची झळ थोड्याफार प्रमाणात लागलेली आहे व लागत आहे. खुद्द ब्राह्मणाब्राह्मणातच जातिविशिष्ट अस्पृश्यतेचा व उच्चनीचपणाचा भाव आहे. पळशीकर ब्राह्मणाचा चित्पावन ब्राह्मणाला पूजेच्या वेळी विटाळ होतो. कायस्थ स्त्रीच्या स्पर्शाने आपले वस्त्र अस्पर्श होऊ नये म्हंणून ब्राह्मण स्त्री कुंकवाचा करंडा खाली ठेवते. अशी स्पृश्य जातीतच परस्परविषयक अस्पृश्यता वसत आहे. अस्पृश्य जातीत ती पूर्णत्वाला पोहचली आहे हाच काय तो फरक. म्हणून आमचे भेटीबंद लुटून आम्ही जरी ' शूद्र ' वर्णात आलो व मुसलमानादी परधर्मीयाइतके जरी स्पृश्य बनलो तरी, अस्पृश्यतेची भावना समूळ मरत नाही. ती मारावयाची असेल तर सरास रोटी-बेटी व्यवहार सुरू झाला पाहिजे. त्याशिवाय अस्पृश्यतेचा रोग नष्ट व्हावयाचा नाही आणि तो तर समूळ नष्ट झालाच पाहिजे. तेवढ्यासाठीच आम्ही झटत आहो. नुसते स्पर्शपावनच व्हावयाचे असते तर परधर्मात जाऊनही अस्पृश्यांना तसे सहजासहजी व सन्मानपूर्वक यापूर्वीच होता आले असते. इतक्या यातायातीची व खेचाखेचीची
मग जरूरच नव्हती . . . .
७ ७ ७