१५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
द्यावे अगर देऊ नये, याच पांढरपेशा प्रश्नांची चर्चा करण्यात या पुढारलेल्या वर्गातील सुधारकांचा वेळ गेला. अस्पृश्यादी मागासलेल्या लोकांच्या हिताहिताशी या चर्चेचा काहीच संबंध पोहचत नव्हता. ब्राह्मण स्त्रियांचे पुनर्विवाह रूढ झाले काय अगर विधवांचे केशवपन होण्याची रूढी थांबली काय, अस्पृश्यतेच्या रूढीवर यामुळे काहीच आघात होण्यासारखा नव्हता
ही रानडे, आगरकर वगैरे महाराष्ट्रीय ब्राह्मण सुधारकांच्या अमदानीतील अस्पृश्यता निवारक प्रयत्नांची दिशा व मर्यादा झाली. सध्या हिंदूसभावाल्यांच्या प्रयत्नांची महाराष्ट्रात धामधूम चाललेली आहे. रानडे, आगरकरांच्या ठायी सुधारणेबद्दल जी एक प्रकारची तळमळ होती तीही महाराष्ट्रातील हिंदूशुद्धि- संघटनवाद्यांच्या ठायी दिसत नाही. आत्मशुद्धिपेक्षा परधर्मीयांच्या शुद्धिकडे व संघटनेपेक्षा संख्येकडेच त्यांचा विशेष ओढा आहे. जर खरे सामर्थ्य संख्येत असते तर आजही हिंदूच बहुसंख्यांक आहेत पण त्यांच्यात संघटना नसल्यामुळे त्यांची संख्या अधिक असूनही तिचा काही उपयोग होत नाही, ही गोष्ट त्यांना दिसते पण तिच्याकडे ते मुद्दाम दुर्लक्ष करतात. यांपैकी बहुतेक पुढारी वारा येईल तशी पाठ फिरविणारे आहेत. यांच्यावर विसंबून अस्पृश्यतेच्या जाचातून आपली सुटका होणार नाही असे अस्पृश्यांस वाटले तर त्यात त्यांचा काय दोष ?
एका मानव जातीला स्वकीयांच्या गुलामगिरीतून सोडविण्याकरता दुसरी मानव जात मनोभावाने झटल्याचे फक्त एकच एक उज्ज्वल उदाहरण जगाच्या इतिहासात सापडणारे आहे व ते निग्रो लोकांची गुलामगिरीतून सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या लोकांचे होय. भाऊ भावाशी, मुलगा बापाशी, मित्र मित्राशी त्या प्रसंगी लढले. जातिभेदावर कुऱ्हाड घालून अस्पृश्यतेचे पाप मुळातच मारून टाकणारा जर एकादा धर्मवीर आपल्या देशात अवतरला असेल तर तो एकटा गौतम बुद्धच होय. पण वरच्यासारखी उदाहरणे व अशा घटना वारंवार घडत नसतात म्हणून असे काही घडेल अशा वेड्या आशेवर आम्हीही विसंबून राहू इच्छित नाही.
आमचे धोरण चढाईचे आहे ; आम्ही विनम्र भावाने व अधोवदनाने जे काही मागावयाचे ते मागत नाही. त्यामुळे अस्पृश्यता निवारणाला अनुकूल असलेले लोकसुद्धा प्रतिकूल बनतात असा एक दुसरा आक्षेप आमच्याविरुद्ध आहे. पण असा आक्षेप घेणाऱ्यांना जनाची नसली तरी निदान मनाची तरी लाज वाटावयाला पाहिजे असे मला वाटते. अस्पृश्याइतका नम्र व लाचार समाज अलम दुनियेत दुसरा कोणता आहे ? आज शतकानुशतके आम्ही नम्र राहिलो नाही काय ?