- २९
अस्पृश्यांनी दिलेली धर्मांतराची नोटीस
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मु. पातुर्डा, जिल्हा बुलडाणा येथे ता. २९ मे १९२९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बार-अँट-लॉ यांचे अध्यक्षतेखाली मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडले. या परिषदेस बाहेर गावावरून अस्पृश्य वर्गाचे पुढारी रा. पी. मटकर, रा. सोनोने, रा. मकेसर, रा. केशवराव खंडारे, रा. संभाजी जाधव, रा. रायभान इंगळे, रा. संभूजी खंडारे वगैरे मंडळी हजर होती. तसेच ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी वे. शा. सं. आनंदस्वामी, श्री. उकंडराव टाले वगैरे मंडळीही हजर होती. लोकसमुदाय दीड हजारावर जमला होता. परिषदेस सायंकाळी ७ वाजता सुरवात झाली. प्रथमारंभी याच परिषदेत रा. बक्षुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतीकाबाई व सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला असून रा. बक्षुरामजीने अस्पृश्य वर्गास अनुकरणीय उदाहरण घालून दिले आहे.
यानंतर परिषदेच्या कार्यास सुरवात होऊन परिषदेचे स्वागताध्यक्ष यांचे भाषण झाल्यावर डॉ. आंबेडकर यांचे विद्वत्ताप्रचुर व मुद्देसूद असे भाषण झाले. ते म्हणाले,
विशेषतः या जिल्ह्यातील अस्पृश्य वर्गाच्या व ब्राह्मणेतर वर्गाच्या पुढाऱ्यांनी मिळून अस्पृश्यता निवारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांना या कामी यश न येता उलट त्यांचा भिक्षुकशाहीकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने अनेकप्रकारे छळ करण्यात येऊन त्यांची योग्य चळवळ हाणून पाडण्याचा कसून प्रयत्न करण्यात आला. पुढाऱ्यांविषयी वृत्तपत्रात खोट्यानाट्या बातम्या प्रसिद्ध _ करणे, अस्पृश्य वर्गात दुही उत्पन्न करणे, ब्राह्मण अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ करविणे, त्यांच्यावर बहिष्कार घालणे अशा तर्हेचे निंद्य प्रकार त्यांनी सुरू करून ती चळवळ अजिबात नेस्तनाबूद करून टाकण्याचा जणू विडाच उचलला आहे. या त्यांच्या अनन्वीत छळाला व लिलेला कंटाळून या जिल्ह्याच्या काही भागातील हजारो अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झालेले आहेत व त्यांनी अशा प्रकारची नोटीस सुद्धा स्पृश्य वर्गाला उद्देशून दिलेली होती ; परंतु या स्वार्थलोलूप अशा अंतःकरणाच्या भिक्षुकशाहीला याची काहीच कल्पना झाली नाही. शुद्धीवाले आणि हिंदुसभावाले यांना तर जणू काय या ada गंधही नाही, हे दाखविण्याकरिता त्यांनी त्यांच्या दुःखाची थोडीदेखील पर्वा केली नाही.
बहिष्कृत भारत : २१ जून १९२९.