१७४ डाँ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
या धर्मांतराच्या बाबतीत आपल्या अस्पृश्य बंधूंचे मत काय आहे, ते जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य वर्गाच्या पुढाऱ्यांनी ही परिषद बोलाविली होती. या परिषदेत पहिल्या दिवशी धर्मांतर करण्याबद्दलच्या ठरावावर उहापोह झाला. त्यात सर्व बहिष्कृत समाज या ठरावाला अनुकूल आहे असेच दिसून आले. ब्राह्मणेतर पक्षाच्या पुढाऱ्यांनी यावर जोरदार भाषणे करून ठरावाला अनुकूल अशीच मते दिली. अध्यक्षसाहेबांनी ठराव मताला टाकला असता त्याला कोणीही विरोध न करता तो सर्वानुमते पास झाला व पहिल्या दिवसाचे काम आटोपले.