३३
एकसंध भारत आमचे ध्येय आहे
' सायमन कमिशनच्या शिफारशीबाबत अस्पृश्य वर्गाची प्रतिक्रिया समजून घेण्याची आणि त्यांच्या राजकीय हक्काकरिता भावी धोरण ठरविण्याची आवश्यकता होती. शिवाय विलायतेत होणार असलेल्या राउंड टेबल परिषदेत अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी जाणे तितकेच महत्त्वाचे होते. कारण हिंदुस्थानच्या भावी राज्यघटनेची योजना त्या परिषदेत आखली जाणार होती आणि देशाचे भवितव्य निश्चित करताना या देशातील सात कोटी अस्पृश्य वर्गाचे राजकीय भवितव्य त्या समाजाच्या प्रतिनिधींना ठरविण्याचा हक्क मिळणे अगत्याचे होते. त्याकरिता अखिल भारतीय स्तरावर अस्पृश्य वर्गाचे अधिवेशन बोलावण्याची निकड होती. अशा प्रकारचे अधिवेशन घेण्याचा अग्रमान नागपूरला लाभला.
येथील स्थानिक पुढाऱ्यांनी ही अखिल भारतीय अस्पृश्य परिषद नागपूरला घेण्यात यावी असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे दशरथ पाटील व लक्ष्मणराव ओगले, एम. एल. सी, यांनी मुंबईला जाऊन डॉ. आंबेडकरांची भेट घेतली. त्या भेटीत अ. भा. दलित वर्गाची परिषद डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नागपूरला भरविण्याचे निश्चित झाले. नागपूरला घेण्यात येणारे ८ व ९ ऑगस्ट १९३० चे अ. भा. डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेसचे अधिवेशन हे अस्पृश्य वर्गाच्या उत्थानाच्या चळवळीतील अशा व्यापक स्तरावरील व प्रातिनिधिक स्वरूपाचे पहिलेच होय !
स्वागत कमिटीचे पदाधिकारी
स्वागताध्यक्ष टी. सी. साखरे, नागपूर, उपाध्यक्ष दशरथ लक्ष्मण पाटील, बेला, खजिनदार विश्रामजी सवाईथूल, नागपूर, सेक्रेटरीज एल. के. ओगले, एम. एल. सी; अमरावती, हरदास एल. एन., कामठी, पी. के. भटकर, अमरावती, शामराव जी. राहाटे, वडगांव, एच. डी. बेहाडे (मातंग पुढारी), नागपूर. “ *
अ. भा. दलित काँग्रेस परिषदेसाठी कोणाकोणाला बोलवावे आणि परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली व्हावी यासाठी परिषदेचे सचिव हरदास एल. एन. यांनी शिवराम जानबा कांबळे, पुणे, यांना पत्र लिहिले. ते पत्र आणि शिवराम जानबा कांबळे यांनी पाठविलेले उत्तर पुढीलप्रमाणे-
" विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास : हि. ल. कोसारे, घृ. १४७-१४८