एकसंध भारत आमचे ध्येय आहे २१७
जनतेला पिळून शुष्क करीत आहे, हे सरकारला माहीत नाही काय ? भारतातील भांडवलदार मजुरांना जीवन निर्वाहास आवश्यक ती मजूरी व योग्य सवलती देत नाहीत हे सरकारला माहीत नाही काय? हे सर्व सरकारला माहीत आहे. परंतु त्यांना स्पर्श करण्याचे धाडस त्याने अजूनही केलेले नाही. का? त्याला ते नष्ट करण्याचे कायदेशीर अधिकार नव्हते म्हणून काय ? मुळीच नाही. त्याने या बाबतीत ढवळाढवळ केली नाही याचे कारण हेच की, अस्तित्वात असलेले सामाजिक व आर्थिक जीवन जर त्याने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याला प्रतिकार होईल, अशी त्याला भीती वाटली. या सरकारचा कोणाला काय उपयोग होणार आहे ? अशाप्रकारे दोन बाबतीत लंगड्या असलेल्या सरकारच्या आधिपत्याखाली जीवन जसेच्या तसेच स्थिर राहणे भाग आहे. देशाच्या हितासाठी आपली अविभक्त निष्ठा वाहू शकतील अशी माणसे अधिकारावर असलेले सरकार आम्हाला हवे आहे. आम्हाला असे सरकार हवे आहे की ज्यातील व्यक्तींना आज्ञापालनाची भावना कोठे संपते व प्रतिकार केव्हा सुरू होतो याची जाणीव असूनही जे अत्यंत आवश्यक अशा न्याय, आर्थिक व सामाजिक सुधारणा करण्यास कचरणार नाही. ही भूमिका पार पाडण्यास इंग्रज सरकार कधीही समर्थ ठरू शकत नाही. तर लोकांचे, लोकांसाठी व लोकांनी चालविलेले सरकार, दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे स्वकीयांच्या सरकारलाच हे संभवनीय होऊ शकते.
२६. तुमच्या मर्यादित उद्देशापुरताच या प्रश्नाचा विचार करा. इंग्रज येण्यापूर्वी अस्पृश्यतेच्या कारणाने तुमची स्थिती अत्यंत दयनीय होती. तुमची अस्पृश्यता काढण्यासाठी इंग्रज सरकारने काही तरी केले आहे काय ? इंग्रज येण्यापूर्वी खेड्यातील विहिरींवर तुम्ही पाणी भरू शकत नव्हते. ब्रिटिश सरकारने हा तुमचा हक्क शाबीत करण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले आहेत काय ? इंग्रजांच्या येण्याआधी तुम्ही देवळात प्रवेश करू शकत नव्हते. आता तुम्ही तसे करू शकता काय ? इंग्रजांच्या आगमनापूर्वी तुम्ही पोलिसाच्या नोकरीत शिरू शकत नव्हते. इंग्रज सरकार आता तुम्हाला पोलिसाच्या नोकरीत भरती करते काय ? इंग्रज येण्याआधी तुम्हाला सैन्यात नोकरी करण्याची परवानगी नव्हती. ती सुविधा आता तुम्हाला खुली आहे काय ? सद्गृहस्थहो ! यापैकी कोणत्याही प्रश्नाला तुम्ही होकारार्थी उत्तर देऊ शकत नाही. ज्यांनी या देशावर इतका लांब काळपावेतो राज्य केले त्यांनी काहीतरी चांगल्या गोष्टी केल्याच असत्या. परंतु तुमच्या स्थितीमध्ये निश्चितपणे कोणताच मूलभूत बदल घडून आलेला नाही. ज्या बाबीशी तुमचा संबंध आहे