संपादकीय
महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत प्रकाशित झालेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या खंड मालिकेतील हा अठरावा खंड वाचकांच्या ` हाती देताना होत असलेला आनंद अवर्णनीय आहे, नव्हे जीवनाच्या कृतार्थतेचं ते समाधान आहे.
प्रस्तुत खंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात दिलेल्या भाषणांचा अंतर्भाव आहे. त्यांनी या देशात केलेल्या महान क्रांतीत त्यांच्या भाषणांचे योगदान अभूतपूर्व आहे. या माध्यमातून लाखो लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध आला, 'गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, त्यानंतर तो त्याविरुद्ध बंड करून उठेल.' या त्यांनी उद्घृत केलेल्या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे, भारतातील गुलामगिरीत पिचत पडलेल्या दलितांना, जे कर्मविपाकाच्या सिद्धांताला मान्यता देत, स्वतःच्या नशिबाला दोष देत ती गुलामगिरी निमूटपणे भोगत होते, तिची जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणांच्या माध्यमातून त्यांना करून दिली, त्याविरूद्ध संघर्ष करण्यासाठी त्यांना या माध्यमातून उद्युक्त केले. आपल्या भाषणांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे वर्णन करताना १४ जानेवारी १९५५ रोजी मुंबईतील एका भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बऱ्याच दिवसांपासून मी एक निर्णय घेतला होता की, कोणत्याही सार्वजनिक कार्यात नुसत्या व्याख्यानासाठी कधीच हजर राहावयाचे नाही. कारण नुसत्या व्याख्यानबाजीचा मला कंटाळा आहे, व्याख्यानात माझा सारा जन्म गेला आहे, उभी हयात गेली आहे. तथापि माझ्या व्याख्यानांचा समाजावर काहीच परिणाम झाला नाही, असे नाही. .आज माझ्यापुढे अस्पृश्य समाजात जी जागृती झालेली दिसून येत आहे, ती माझ्या व्याख्यानांचेच फळ आहे, असे मी अभिमानाने सांगू शकतो.” (प्रस्तुत खंड, भाग-३,पृष्ठ-४२५)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सुरवातीच्या सार्वजनिक जीवनाच्या काळाचे वर्णन करताना म्हणतात, “ज्यावेळेस मी चळवळ सुरू केली त्यावेळेस मी, अध्यक्ष आणि टेबल एवढेच होतो ! त्याच्यावरून मी हताश झालो नाही.“ (प्रस्तुत खंड भाग-३, पृष्ठ-३४७) ज्याचे सार्वजनिक जीवन अशा पद्धतीने सुरु झाले, त्या माणसाने स्वतःच्या कर्तृत्वाने काळाला नवी दिशां दिली, त्याच्या सभेला लाखोच्या संख्येने माणसे यायला लागली, तीही उत्स्फुर्तपणे, दूरदुरून, पायपीट करीत. ज्यांनी त्यांची भाषणे ऐकलीत तो प्रसंग त्यांच्या जीवनातील एक अमोल ठेवा ठरला, जो त्यांनी स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपला.