३१-५-१९३१ खडतर परिस्थितीशी झगडूनच समाजोन्नती शक्य. - Page 307

अस्पृश्यता जगातील . .... - भीषण आहे २६५

आपल्या पायाखालचे जीव,त्यांना आपण केव्हाच चिरडून टाकू अशी घमेंड यांना वाटत होती म्हणून ते त्यांच्या आवडत्या पुढाच्यांचा, काही प्रसंग व कारण नसता अपमान व अपराध करण्यास प्रवृत्त झाले. अस्पृश्य स्वयंसेवकांनी चित्तक्षोभ होऊ दिला नाही व त्यांचे हे चाळे कायद्याबाहेर जाऊ लागले असे पाहून सरकारी शिपायांनी या गोंधळ्यांना हुसकावून लावले. म्हणून स्पृश्य व अस्पृश्य यांची मारामारी होण्याचा प्रसंग टळला. पण या एकंदर प्रकरणात नामुष्की कोणाची झाली? सरकारचे शिपाई गुंडगिरी करतात व गांधी-आयर्विन तह मोडतात असे

म्हणणाऱ्या काँग्रेस पुढाऱ्यांची या कॉँग्रेसवाल्यांच्या गुंडगिरीने नामुष्की नाही का झाली?

डॉ. आंबेडकरांच्या जाहीर सन्मानाचा व जाहीर भाषणाचा तेथील तरूण मंडळाने आखून ठेवलेला कार्यक्रम बिघडविण्याचा यांचा हेतू सुद्धा सिद्धिला गेला नाहीच; उलट यांच्या विघ्नसंतोषीपणाला आळा घालण्याकरता अपेक्षेपेक्षाही प्रचंड जनसमुदाय त्यांच्या सन्मानार्थ व त्यांचे भाषण ऐकण्यास जमला होता. काँग्रेसच्या व गांधीजींच्या राजकारणाची छाननी करून त्यांचा व आपला काय, कोठे व का मतभेद होतो याचे थोडक्यात व मुद्देसूद विवेचन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. अस्पृश्य तरुणांना उद्देशून ते म्हणाले,

आपला संग्राम सर्व प्रकारच्या गुलामगिरीविरूद्ध आहे. अस्पृश्यतेची प्रचलित गुलामगिरी जगातील इतर सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण असून एकट्या हिंदू समाजाच्या अगर धर्माच्या मुखावरीलच तो काळाकुट्ट कलंक नसून अखिल मानव धर्माचे व माणुसकीचे ते लांच्छन आहे. आपण हिंदू समाजाचे अभिन्न असे घटक आहो व म्हणून हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक संस्थेस व मंदिरात प्रवेश करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तुमची आजची एकंदर तयारी व धिटाई पाहून मला समाधान वाटले. पण माझ्या पुढील भेटीच्या वेळी याहीपेक्षा तुमची अधिक तयारी झालेली व अस्पृश्यता निवारणाचे तुमचे अंगीकृत कार्य अधिक परिणामकारी झालेले पाहण्याची मी अपेक्षा करतो. डॉ. आंबेडकरांचे हे जाहीर भाषण अहमदाबादच्या प्रेमाभाई हॉलमध्ये झाले.