४२
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भीषण आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सेक्रेटरी श्री. शिवतरकर हे दि. २८ जून १९३१ रोजी अहमदाबादेस गेले होते. अस्पृश्यवर्गीय विद्यार्थ्यांकरता तेथे स्थापन झालेल्या विद्यार्थीगृहाची पाहाणी करणे व त्यासंबंधी इतर व्यवस्था लावणे हा त्यांचा तेथे जाण्याचा हेतू होता. डॉ. आंबेडकरसाहेब येणार ही बातमी जरी अहमदाबादच्या अस्पृश्य जनतेला अगदी आयत्यावेळी समजली तरी त्यांनी त्या तेवढ्या अल्पवेळात आपल्या सन्माननीय पुढाऱ्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली. हजारो अस्पृश्य मंडळी डॉ. आंबेडकरांच्या दर्शनार्थ अहमदाबादला व अहमदाबादच्या स्टेशनवर जमा झाली. येथील अस्पृश्यवर्गीय युवक मंडळाने (Youth league) व अस्पृश्यांच्या निरनिराळ्या सरासरी तीस संस्थांनी आपआपली स्वयंसेवक पथके आणून नीट व्यवस्था ठेविली होती. पण अस्पृश्य समाजाची ही स्वयंस्फूर्तीजन्य व स्वावलंबी तयारी पाहून एक प्रकारचे कौतुक व धन्यता मानून घेण्याऐवजी तेथील गुजरात प्रॉव्हिशियल काँग्रेस कमिटीतील काही हिंदू सभासदांच्या पोटात मत्सराचा व द्वेशाचा वायगोळा उठला ! आपले ध्येय काय? आपल्या पुढाऱ्याने कसल्या व्रताची दीक्षा आपणास दिली आहे वगैरे गोष्टींचा विचार न करता हे काँग्रेसवाले हातात काळी निशाणी घेऊन व तोंडाने कसले तरी घाणेरडे व काँग्रेसला काळिमा फासणारे शब्द उच्चारीत डॉ. आंबेडकरांवर "शेम चा' वर्षाव करण्याकरिता गेले, या उन्मत्त व अविचारी गुंडांनी अस्पृश्यांना चीड येईल व त्यांचा अपमान होईल असले चाळे करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यांची मुस्कटदाबी करण्याला अस्पृश्य स्वयंसेवकांना व जनतेला मुळीच उशीर लागला नसता. पण डॉ. आंबेडकर येण्याची वेळ जवळ आल्यामुळे त्यांच्या समक्ष हा गोंधळ नको म्हणून त्यांनी आपली शांतता व शिस्त ढळू दिली नाही. तरी या कॉँग्रेसवाल्यांनी लोटालोटी करण्याचा प्रयत्न करून थोडा फार गोंधळ माजविलाच ! नुकतेच मौलाना शौकतअली येथे येऊन गेले तेव्हा त्यांचा धिक्कार करण्णचे धाडस या भ्याडांना झाले नाही. कारण अस्मृश्यांप्रमाणे मुसलमान हे शांतता धरणार नाहीत, वेळ आली तर आपल्या- पेक्षाही सवाई गुंड बनून ते आपली टाळकी शेकतील याची पूर्ण खात्री त्यांना असल्यामुळे ते बड्या भाईची कुचेष्टा करण्यास धजले नाहीत. अस्पृश्य हे काय?
जनता : ६ जुले १९३१.