४४
लढा बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी
आपलेपणाच्या नात्याने स्वीकारा
दिनांक १४ ऑगस्ट १९३१ रोजी भगिनीवर्गाच्या सभेनंतर १० वाजेपर्यंत पगारे बंधू चांदोरीकर यांच्या सामाजिक जलशाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. डॉक्टर साहेबांनी जलशेवाल्यांचे अभिनंदन करून आभार मानले व त्यांना एक रौप्य पदक आपल्या हस्ते अर्पण केले.
पुरूषवर्गाचा निरोप घेताना डॉ. आंबेडकरांनी फारच परिणामकारक भाषण केले. त्यांचे अंत:करण पिळवटून सोडणारे भाषण ऐकून सर्वांची मने भावी लढ्यासाठी उत्सुक झालेली दिसत होती. अध्यक्ष डॉ. सोळंकी यांनी विलायतेला जात असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या कामगिरीची सर्वांना जाणीव करून दिल्यावर डॉक्टर साहेब बोलावयास उठले. ते म्हणाले,
आपणास आजपर्यंत मिळालेल्या यशाचे वाटेकरी डॉ. सोळंकीही आहेत हे मला विसरून चालणार नाही. आपला लढा बिकट आहे व आपल्या कार्यात यश मिळविणे कठीण काम आहे. या परिषदेमध्ये अखिल हिंदुस्थानातून प्रत्येक पक्षाचे, पंथाचे, जातीचे मिळून जवळ जवळ १२५ प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधीत आपल्या समाजातर्फे अवघे दोनच प्रतिनिधी निवडले जावेत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. आम्ही दोघे एके बाजूला व इतर प्रतिनिधी एके बाजूला अशा परिस्थितीत येत्या राऊंड टेबल परिषदेत कितपत यश मिळेल हे आजच मला सांगता येत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तुमचे माझ्यावरील इतके अलौकिक प्रेम पाहून मला प्रत्येक कार्य करण्याची उमेद वाटते ; आणि या उमेदीच्या बळावर मी माझ्या कार्याचा पायाच बांधला आहे : आणि आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढण्यात जितके यश मिळविता येईल तितके मिळवीन. मी परत येईपर्यंत तुम्ही मात्र आपली संघटना अधिक व्यापक करून माझ्या मागे डॉ. सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली आपले कार्य करीत
रहा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझी म. गांधींबरोबर जी मुलाखत झाली त्यात मला पूर्णपणे निराशा दिसून आली. आपल्या राजकीय हक्कासंबंधी म. गांधी आजच्या परिस्थितीत काहीच करू शकत नाही व त्यांना आमच्यासाठी जितके आपलेपणाच्या भावनेने काम करावयाचे आहे तितके करता येणे अशक्य आहे. गांधींच्या मुलाखतीची सविस्तर हकिगत तुम्हाला जनता पत्राच्या
जनता : १७ ऑगस्ट १९३१.