१४-८-१९३१ अस्पृश्य स्त्रियांनी सर्वांगीण सुधारणेसाठी झटावे - Page 310

२६८ डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

माहितीवरून कळेलच. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण आपले बळ अधिक वाढवा व आपला लढा नेटाने पुढे चालवा. येत्या सिंहस्थामध्ये नाशिक क्षेत्री जो सत्याग्रह होणार आहे तेथे जाऊन पैशाने व मनुष्यबळाने सहाय्य करा. मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाने नाशिक जिल्ह्याने मोठीच कामगिरी बजाविली आहे; आणि म्हणून आपण त्यांच्या हाकेला ' ओ ' देऊन तो लढा कितीही बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने स्वीकारा. नाशिक जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्हाही मागासलेला नाही असे मला आता वाटू लागले आहे. दोन महिन्यापूर्वी ' पुणे जिल्हा बहिष्कृत परिषद ' भरली होती. तिच्या एकंदर कार्यावरून लवकरच त्या जिल्ह्यात मोठी जोमाने चळवळ सुरू होईल. ही परिषद यशस्वी करून पुणे जिल्हा कोणत्याही जबाबदारीच्या कार्याला तयार आहे असे माझे मित्र श्री. रेवजीबुवा डोळस यांनी माझ्या नजरेस आणून दिले. त्यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या सहाय्याने ही चळवळ आपल्या जिल्ह्यात अशीच उज्वल स्वरूपात चालू ठेवावी. समता सैनिक दलाच्या आजच्या शिस्तीचा मला अभिमान वाटतो. तरीपण ही शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी कायम ठेवून आपले कार्य यशस्वी करण्याचा संकल्प व्यापक स्वरूपात करावा. आपली शिस्त व संघटना कायम ठेवून आपले जबाबदारीचे कार्य आपण माझ्या गैरहजेरीत उत्तमप्रकारे पार पाडाल अशी आशा बाळगतो. त्यांनी यानंतर आपले भाषण संपविले.