४५
माझ्या लोकांच्या हितसंबंधांचा
प्रतिनिधी मीच आहे
गेला गुरुवार म्हणजे ता. ८ ऑक्टोबर १९३१ हा दिवस राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा होता. अल्पसंख्यांकांच्या प्रश्नाची वाटाघाट करण्याकरिता जी एक खाजगी कमिटी म. गांधींच्या अध्यक्षतेखाली नेमली गेली होती व आठ दिवस वाटाघाट होऊनही जिच्यात या प्रश्नाचा निकाल लागला नाही त्या कमिटीतील काही सभासदांची त्या दिवशी भाषणे झाली. अल्पसंख्यांकांच्या प्रश्नाचा समाधानकारक निर्णय होऊ शकला नाही व पंजाबातील हिंदू. मुसलमान व शीख यांच्या मागण्यांची तोंडमिळवणी न झाल्यामुळे या कमिटीला हा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत अपयश आले, याबद्दल सर्वांनी खेद व्यक्त केला. काँग्रेसच्या वतीने म. गांधीजींनी अस्पृश्यांच्या बाबतीत जे पक्षपातीपणाचे व अन्यायाचे धोरण स्वीकारले होते त्याला स्पष्टपणे विरोध करणे डॉ. आंबेडकरांना या प्रसंगी प्राप्तच होते. पण म. गांधींना डॉ. आंबेडकरांनी विरोध केला ; एवढ्याच एका गोष्टीचा बागुलबुवा करून व्यक्तिश: त्यांच्याविषयी आपल्या वाचकांची मने करवितील तितकी कलुषित करणे हा येथील काँग्रेस हिंदुराष्ट्रीय पत्रकारांचा व देशभक्तांचा धर्मच होऊन बसलेला आहे. डॉ. आंबेडकरांनी विरोध का केला व तसा तो त्यांनी का करू नये याचा निर्विकार चित्ताने विचार करण्याचे औदार्य या देशभक्तांच्या वाट्याला आलेले दिसत नाही. महात्मा गांधीजींची योजना मग ती सुसंगत असो वा विसंगत असो तिला विरोध करणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला विरोध करण्याइतके भयावह व पापमूलक आहे. सरकारच्या चिथावणीशिवाय असे कोणी करणारच नाही अशा चुकीच्या व भ्रामक कल्पना या राष्ट्रीय व देशभक्त वर्तमानपत्रकारांनी आपल्या उराशी बाळगून ठेविल्या असून त्यांचा प्रसार रोज नियमितपणे ते आपल्या वाचकात करून राहिलेले आहेत. " डॉ. आंबेडकर हे अस्पृश्यांचे प्रतिनिधी अगर पुढारी नाहीत. त्यांना केवळ सरकारने निवडून दिलेले आहे. अस्पृश्यांचे खरे लोकमान्य पुढारी दुसरेच आहेत व ते काँग्रेसच्या संग्रही आहेत. काँग्रेस व मी हेच कांय ते अस्पृश्यादी सर्व अल्पसंख्यांक समाजाचे प्रतिनिधी आहेत. अशा आशयाचे तुणतुणे म. गांधींनी आधीपासूनच वाजविण्यास सुरवात केली होती. गुरुवारच्या भर सभेतही याच मुद्यांवर त्यांनी भर दिला. त्यामुळे त्यांच्या
जनता : १२ ऑक्टोबर १९३१.