२८८ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वतीने पाठिंबा देणे हे कसे युक्त व आवश्यक होते ही गोष्टही रावबहादूर राजांना अगदी पुरेपूर माहीत आहे, व या कराराबद्दलची आपली संमती व संतोष व्यक्त करून मला परवापर्यंत त्यांनी याही बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला होता. पण तेच आता या करारनाम्यालाही नावे ठेवीत आहेत. यात आता अपराध कोणाचा याचा निर्णय आपण जनतेनेच दिला पाहिजे व पुढाऱ्यांनी तो मानला पाहिजे.
अस्पृश्य समाज संघटित होईल व राजसत्तेची सूत्रे हाती धरील तेव्हाच त्यांची अस्पृश्यता नष्ट होईल. होता होईल तो आपल्या रक््तामासाच्या व आपल्या सुख- दुःखांची स्वानुभवाने जाणीव असणाऱ्या व्यक्तीवरच विश्वास ठेवा. इतरांच्या अघळपघळ आश्वासनाँना व सुंदर सुंदर तत्त्वांना भुलून जाऊ नका. राजसत्ता हाती येण्यासाठी एकजुटीने, स्वावलंबनपूर्वक व स्वतःवर व स्वतःच्या संघ शक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही जर कार्य कराल तर आज जे तुम्हाला तुच्छ लेखतात व वाटेल तसे झुलवितात ते तुमच्या पायावर उद्या लोटांगण घालू लागतील व तुमची सदिच्छा व मैत्री संपादण्याकरता तुम्ही इच्छाल ते न मागता देतील.
स्वामी सहजानंद यांनी अध्यक्षांचे व पाहुण्यांचे आभार मानल्यानंतर रात्री आठ वाजता सभेचा कार्यक्रम संपला.
| oe ७ ७