८-५-१९३२ अस्पृश्य समाजाच्या हाती राजकीय सूत्रे हवीतच - Page 334

डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २९२

त्यानुसार कामठी येथे दिनांक ७ आणि ८ मे १९३२* ला अखिल भारतीय दलित कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याकरिता लोकांचा उत्साह अतिशयच दांडगा होता. डॉ. आंबेडकर हे शुक्रवार ता. ६ मे १९३२ रोजी मुंबई येथून नागपूर मेलने निघणार हे नागपूरला आगाऊच जाहीर झाले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब मुनुस्वामी पिल्ले व मद्रासकडील प्रतिनिधी हेही शनिवारी सकाळी येण्याचे जाहीर झाले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी ५-४५ च्या नागपूर मेलने डॉ. आंबेडकर व मुंबईतील इतर प्रतिनिधी निघाले. त्यांना बोरीबंदरवर निरोप देण्यात आला होता. नागपूर मेल झपाझप आपला मार्ग आक्रमित मोठमोठ्या स्टेशनक्र थांबत असे. बोरीबंदर सोडल्यापासून मेल कल्याण येथे थांबते. कल्याणच्यः प्लॅटफार्मवर गाडी येताच ' डॉ. आंबेडकर की जय ' म्हणून जयनाद उमटताच स्टेशनभर चोहोकडे खळबळ व गडबड सुरू झाली. लोकांनी डॉ. आंबेडकरांना हारतुरे अर्पण केले व त्यांच्या कार्यास यश चिंतिले. अगदी हा व असलाच प्रकार कसारा, इगतपुरी, देवळाली, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, मुर्तिजापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव वगैरे स्टेशनवर झाला. ह्याच गाडीला आसामचे गव्हर्नर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकांना प्लॅटफार्मवर सोडण्यात आले नाही. तरीपण लोकांनी दर एक स्टेशनचे वातावरण डॉ. आंबेडकरांच्या जयजयकारानी अगदी निनादून सोडले. दिनांक ७ मे १९३२ रोजी नागपूर मेल बरोबर ९ वाजता नागपूर स्टेशनवर पोहचताच, ' डॉ. आंबेडकर की जय ' ' बाबासाहेब आंबेडकर की जय ' च्या गगनभेदी गर्जना चोहोकडे घुमू लागल्या. जवळ जवळ ५,००० लोक प्लॅटफार्मवर डॉ. साहेबांच्या स्वागतास आतुरतेने वाट पाहात बसले होते. डॉ. आंबेडकर डब्यातून उतरताच व श्री. तुळशीराम साखरे, एम.एल.सी. ह्यांनी त्यांचे स्वागत करताच नागपूर येथील समता सैनिक दलाच्या बँडचे सुस्वर नाद वातावरणात विलीन होऊ लागले. ' लोकांच्या गर्दीपुढे. सिटी मॅजिस्ट्रेट, पोलीस सुपरिन्‌टेडेट व इतर पोलीस ऑफिसर्सना' बंदोबस्त करता करता नाकीनऊ आले. स्टेशनबाहेर पडताच समता सैनिक दलाच्या १,००० व्हालंटियर्सनी पाहुणे मंडळीस ' गार्ड ऑफ ऑनर ' दिला. स्टेशन कंपौंडमध्ये लोकांचा नुसता तोबा उडून गेला होता. दहा ते पंधरा हजारांचा प्रचंड लोकसमुदाय बाहेर ' डॉ. आंबेडकर की जय ' म्हणून सारख्या घोषणा देत होता. आज नागपूर येथील सर्व गिरण्या, कामगार लोक डॉ. आंबेडकरांच्या स्वागतास आल्यामुळे बंद होत्या. एका गिरणीत हिंदू व काही मुसलमान कामगार फक्त गेले होते.

* परिषदेची तारीख वदलविणारे पत्रक मिळाले नाही - संपादक.