५-९-१९३२ आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता आहे - Page 348

३०६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अध्यक्ष होऊन अस्पृश्यांकरिता स्वतंत्र मतदार संघ मागितला त्याच अध्यक्षांनी विरूद्ध पार्टीच्या लालुचीला भुलून आपली मते बदलून टाकली व मतदार कमिटीपुढे अस्पृश्यांकरिता संयुक्त मतदार संघ मागितला. अशातऱ्हेने जर पुढारी आपणाला विकून घेऊ लागला तर आपल्या हाती आलेली सत्ता काय उपयोगाची ? काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर काम करणारा सातारा जिल्ह्यातील एक घोलप नावाचा कालचा पोरगा असे म्हणतो की, शिवतरकर मास्तर चांभार असून त्यांना साहेबांनी जवळ धरले म्हणून माझ्याशी असहकार्य केले. परंतु हा साताऱ्याचा महार ज्याला शिवतरकर चांभार म्हणून त्याची घाण येते, तोच देवरुखकरासारख्या चांभाराच्या आश्रयाखाली वर्तमानपत्रे काढून मला शिव्या देतो. महार समाजाची वाटेल तशी नालस्ती करून देवरूखकरांनी आमच्या समाजाची अब्रु चव्हाट्यावर आणिली आहे, त्याच देवरूखकरांच्या आश्रयाखाली. काम करावयास या लांबनाक्या महारास काहीसुद्धा कशी लाज वाटत नाही ? . इतर समाजातील माणसे नेहमी शिव्या देतात तर आपणापैकीच एका महाराने शिव्या दिल्या तर त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. . परंतु मला इतकीच शंका येते की, तुम्ही आपल्याला मिळालेल्या हक्काचा योग्य उपयोग कराल की नाही ! मी जी एवढी चळवळ चालविली आहे ती काही तरी तत्त्वाला धरून चालविली आहे. आपल्या पुढाऱ्यांची ही अशी नीतिमत्ता पाहून मला खेद होतो. मला तुम्हाला एवढीच विनंती करावयाची आहे की, तुही स्वाभिमानी व्हा. आपला पुढारी कोण हे ठरवा व तो सांगेल त्याप्रमाणे वागा. आपली मते निष्कारण विकू नका. नाहीतर कोणी येऊन एक दोन रुपये देऊन तो तुमची मते घेइल. मतदानाबद्दलसुद्धा आपणास पुष्कळशा सवलती मिळाल्या आहेत. इतक्या सवलती दुसऱ्या कोणत्याच समाजाला दिल्या नाहीत. इतर समाजातील इसमांना मत देण्याचा अधिकार प्राप्त होण्याकरिता कमीतकमी मराठी चौथी इयत्तेपर्यंत त्याचे शिक्षण पाहिजे, परंतु अशी स्थिती तुमची नाही. तुम्हाला फक्त आपली सही मात्र करता आली पाहिजे. तुम्हाला नुसत्या ' रामापांड्या ' एवढी सही करता आली की तुमचा मत देण्याचा अधिकार प्राप्त झाला. ही सवलत इतर दुसऱ्या कोणत्याच समाजाला मिळालेली नाही. फक्त अस्पृश्यांना आहे. म्हणून म्हणतो तुम्ही प्रत्येकाने रात्रीच्या शाळेत जाऊन सही पुरते तरी शिक्षण घेणे आता फार जरूरीचे झाले आहे व असे केल्याने तुमची नावे रजिस्टर होतील