५-९-१९३२ आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता आहे - Page 347

आजचा आमचा लढा राजकीय सत्तेकरिता आहे ३०५

त्याशिवाय, अहमदाबादसारख्या ठिकाणी जेथे ८० किंवा ९० टक्के मजुराची वस्ती आहे तीतून २-३ जागा अस्पृश्यांना मिळतील. शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी . जेथे अस्पृश्यांची वस्ती आहे तेथून १-२ जागा आपल्याला मिळविता येतील. शिवाय नाशिक जिल्हा, पुणे तेथून स्वतंत्र मृतदार संघाच्या योगाने आपण निवडून दिलेले शेकडा ९० टक्के आपल्या मुठीत राहतील.

मुंबई कौन्सिलमध्ये एकंदर २०० जागा आहेत त्यापैकी ९७ हिंदूंकरिता, ६३ मुसलमानांकरिता व १० अस्पृश्यांकरिता व असे असल्याकारणाने कोणत्याही एकाच बाजूस जास्त सत्ता मिळणे अशक्य आहे. कारण कौन्सिलमध्ये जे काम चालणार ते बहुमतानेच चालणार आहे म्हणून कोणत्याही एका पक्षाचे बहुमत होण्यास कमीतकमी ११५ तरी मते एका बाजूला पाहिजेत. म्हणून नुसत्या हिंदुंच्या ९७ लोकांना काही बहुमत करिता येणे शक्य नाही. त्याचप्रमाणे मुसलमानांनाही ६३ मतांवर राज्यसत्ता गाजविता येणार नाही. बहुमत होण्याला त्यांना दोघांनाही अस्पृश्यांची मते मिळाली पाहिजेत. आपल्या हातात अशा रीतीने फार मोठी सत्ता मिळाली आहे. कारण ज्या बाजूला आपण आपली मते देऊ त्या बाजूचे पारडे खालीच जाईल व विरूद्ध पारडे वरतीच लटकत राहील. इतकी सत्ता जरी आपल्या हाती आलेली आहे तरी पण मला एक भयंकर शंका उत्पन्न झाली आहे व ती म्हणजे तुम्हामध्ये मतदानाची अक्कल कोठपर्यंत आहे ? आज आपणास ज्या १० जागा मिळाल्या आहेत त्या जागांवर आपल्या- पैकी जे लोक जातील त्यांना वाटेल ते कार्य साधता येईल. त्यांना इकडूनची मुंबई तिकडे करिता येईल, पण त्या जागांचा योग्य उपयोग मात्र झाला पाहिजे. सर्व अस्पृश्यांचा उद्धार या अवघ्या १० माणसांना करता येईल. इतके दिवस एखादे साधे कार्य करावयाचे म्हणजे कलेक्टराकडे किंवा मामलेदाराकडे पुष्कळशा खेपा घालाव्या लागत होत्या व अशाच दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दाढी धरावी लागत होती. एवढेच कशाला परंतु एखादे काम जरी करावयाचे असल्यास एखाद्या ७ रुपये मिळविणाऱ्या यत्किंचित शिपु्ड्याला माझ्यासारख्या इसमास सुद्धा हवालदार साहेब म्हणून हाक मारावी लागत होती. पण आता यापुढे आपणावर असा प्रसंग कधीच यावयाचा नाही. तर आता ह्यापुढे सर्व गोष्टी कायद्याने होतील. आपणापैकी काही अस्पृश्यच कलेक्टर होतील. शेकडा २० मामलेदार, शेकडा २० कुळकर्णी व शेकडा २० शिपाई आपले अस्पृश्य होतील व असे करण्याकरिता आता आपणास कोणाचीही दाढी धरावी लागणार नाही, परंतु हे सर्व आपल्या लोकांचे शील काय प्रकारचे बनेल यावर अवलंबून राहील. कारण आपणातील काही जण दोन पैशाच्या फुटाण्याला किंवा एक दमडीच्या पोह्याला भुलून आपली मते बदलतात हे आमच्या अनुभवाला आले आहे. ज्या पुढाऱ्यांनी गेल्या मार्च महिन्यात अस्पृश्यांच्या सभा भरवून आणि