५५
अस्पृश्य समाजास शिक्षण प्रसाराची निकड
शनिवार, ता. १० सप्टेंबर १९३२ रोजी रात्री महार बालवीर संस्थेमार्फत परळ मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये सभा झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले, त्याचा गोषवारा :--
दामोदर हॉल आबालवृद्ध स्त्री-पुरुषांनी अगदी फुलून गेला होता. आत प्रवेश न मिळाल्यामुळे शेकडो लोक मोठ्या उत्सुकतेने बाबासाहेबांचे अभूल्य बोल कानी पडावे म्हणून धडपड करीत होते. आमच्या बातमीदारास सभेस यावयास थोडा उशीर झाल्यामुळे मोठ्या मुश्किलीने त्यास आत जाता आले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बाबासाहेब बोलावयास उभे राहिले. परंतु हाच प्रचंड ध्वनी त्यांच्या मुखातून शब्दध्वनी उमटताच निमिषार्धात स्तब्ध झाला व सभा निश्चल होऊन बाबासाहेबांचे बोल श्रवण करू लागली. प्रारंभी मंडळाच्या बहुविध कार्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या शैक्षणिक कामगिरीची त्यांनी विशेष प्रशंसा केली. मंडळाने सादर केलेल्या हिशोबाच्या तक्त्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितले की, मंडळाने माझ्या स्वत:च्या गौरवाकरिता पुष्पहारानिमित्त जी रक्कम खर्ची घातली आहे ती अधिक उपयुक्त कामाकडे खर्च करावयास पाहिजे होती व त्या खर्चाचे ओझे मंडळाच्या आर्थिक शक्तीकडे पाहिले असता असहनीय आहे. म्हणून ते ओझे मंडळावर पडू नये व त्यास कार्यविस्तार करण्यास मदत व्हावी यासाठी त्यांनी याप्रसंगी मंडळास अल्पशी मदत म्हणून २५ रुपयांची देणगी जाहीर केली. ते पुढे म्हणाले की,
आज अस्पृश्य समाजास अत्यंत निकडीचे असे कोणते कार्य असेल तर ते
शिक्षण प्रसार हे होय. समाजातील प्रत्येक व्यक्तीने तसेच हरएक संस्थेने शिक्षणाच्या बाबतीत आपल्या तरुण पिढीचे पाऊल पुढे कसे पडेल ह्या प्रश्नाकडे आपले लक्ष पुरविले पाहिजे व त्या अनुरोधाने आपल्या कार्याची दिशा ठरविली पाहिजे. आपण स्वतः देखील हेच कार्य अंगिकारले असून त्यादृष्टीने कार्य चालू ठेविले आहे आणि ह्याचे प्रत्यंतर म्हणजे सध्या अस्तित्वात असलेली ३ बोडिंगे. महाराष्ट्रातील मुलांकरिता ठाणे येथील बोर्डिंग, कर्नाटकातील शिशुवर्गाकरिता धारवाड येथील बोडींग व गुजरातमधील बालकांकरिता अहमदाबाद येथे स्थापलेले होस्टेल ही ती तीन बोडिंगे होत. या तीनही ठिकाणी मिळून आज जवळ जवळ १०० मुलांची सोय झाली आहे.
जनता : १७ सप्टेंबर १९३२.