६१
वंशपरंपरेची कामे सोडून
शिक्षणाची कास धरा
शुक्रवार, तारीख २८ ऑक्टोबर १९३२ रोजी मुंबईच्या अपोलो बंदर येथे सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. पी. जी. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्य वर्गाचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबईतील ऋषी समाजातर्फे मानपत्र देण्याकरिता जाहीर सभा भरली होती. सभेच्या ठिकाणी व्यवस्था ठेवण्याकरिता समता सैनिक दलाचे स्वयंसेवक हजर होते.
डॉ. आंबेडकरांनी मानपत्राचा स्वीकार केल्यावर ते म्हणाले,
मी फार दिलगीर आहे की, हे मानपत्र फक्त मला एकट्यालाच देण्यात येत आहे. अस्पृश्य वर्गाचे जे काही काम होत आहे ते सगळे माझ्या एकट्याकडून होत आहे हे म्हणणे अगदी खोटे आहे. या कामात जितके तुम्ही मला श्रेय देता त्यापेक्षा जास्त श्रेय डॉ. सोळंकी व माझ्याबरोबर काम करणारे लोक यांना दिले पाहिजे. डॉ. सोळंकी माझ्याबरोबर काम करितात. मी गेल्या तीन वर्षात कौन्सिलमध्ये काहीच काम केले नाही. पण डॉ. सोळंकीसाहेबांनी कौन्सिलात अस्पृश्य वर्गाची फार बहुमोल सेवा केली आहे. पुण्याला हिंदू पुढाऱ्यांच्या बरोबर जी आमची वाटाघाट झाली त्यावेळी डॉ. सोळंकी यांनी मला फार फार मदत केली. त्यांनी त्यांना देण्यात यावयाच्या मानपत्राचा स्वीकार न करिता मलाच मानपत्र दिले पाहिजे असे जे या सभेच्या चालकास सांगितले हा त्यांच्या मनाचा थोरपणा होय. शेवटी मला आपणाला हेच सांगावयाचे आहे की, पुणे करारात आपला जो फायदा झाला आहे त्याचा उपयोग आपले लोक कसा करून घेतील हे समजत नाही. संसारामध्ये मनुष्याला जी सुख-दुःखे भोगावी. लागतात ती ईश्वरी इच्छेनेच होतात, आपले दारिद्र्य हे आपणासाठीच आहे असे लोक मानतात. त्यासाठी सगळ्यांनाच मला हे सांगावयाचे आहे की, ही अशी स्वतःला नीच समजण्याची भावना सोडून द्या. लक्षात ठेवा की, राजकारणात जो मोठा बदल झाला आहे त्याची उच्च वर्णाचे हिंदू लोक काही किंमत करीत [नाहीत. ] ते लोक या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत. त्याकरिता आपणाला पुन्हा हिंदू लोकांच्या गुलामगिरीत राहण्याचा प्रसंग येणार नाही, कारण आता [यापुढे ] [जे ] कायदे व्हावयाचे ते अस्पृश्य वर्गाच्या संमतीनेच [होतील. ] ही एक सामाजिक क्रांती आहे. मी आपणास सांगतो की, अस्पृश्य वर्गाला [जे ] [हक्क ] [मिळाले ]
जनता : ५ नोव्हेंबर १९३२.