२८-१०-१९३२ वंशपरंपरेची कामे सोडून शिक्षणाची कास धरा - Page 424

३८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

गांधींबरोबर झालेला तह हिंदू लोकांना आवडत नाही हे मी ओळखून आहे. फक्त गांधींनी उपवासास सुरुवात केली म्हणून त्यांना वाचविण्याकरिता हा तह हिंदूंना करावा लागला. तरीपण आपल्या हाती आलेली सत्ता हिसकावून घेण्याचा ते प्रयत्न करतील आशी मला शंका आहे. तेव्हा आपल्या हाती आलेली सत्ता तुम्ही गमावणार नाही अशी मला आशा आहे.

दुसरी एक महत्त्वाची पण अगत्याची सूचना मी आपणाला देतो की, सहभोजन . व मंदीर प्रवेश यांच्या मी विरुद्ध नाही. पण या प्रकाराने आपणास राजकीय हक्क मिळणार नाहीत. आपणाला संसार चालविण्याची आवश्यकता आहे. भाकर, अंगावर कपडा, राहावयास चांगली जागा आपणास पाहिजे. ज्याप्रमाणे उच्च वर्गाचे हिंदू लोक आपल्या मुलांना शिक्षण देतात, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षण देण्याची फार जरूरी आहे व त्यांच्याप्रमाणे आपणही सर्व प्रकारच्या सरकारी नोकरीत शिरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जर आपण केले तरच आपला उद्धार होईल.

शेवटी क्रषी मंडळींना मी एक प्रेमाची सूचना देतो की, आपल्या अस्पृश्य वर्गात ज्या काही जाती आहेत त्या नाहीशा करण्याचे आपण प्रयत्न केले पाहिजेत. अस्पृश्य वर्गात सांमाजिक सुधारणा करण्याचे पुष्कळ प्रयत्न केले पाहिजेत. ज्याप्रमाणे कोणत्याही घराचा पाया मजबूत असला तरच ती इमारत जास्त दिवस टिकते त्याप्रमाणे ऋषीसमाज अस्पृश्य वर्गाचा पाया आहे. म्हणून त्यांचे सामाजिक कार्य अस्पृश्य वर्गाला आदर्श रुप पाहिजे. ऋषीसमाज जर जाहीर करील की आम्ही कोणत्याही जातीपेक्षा नीच नाही व उच्चही मानीत नाही तर अस्पृश्य वर्गात सुधारणा फार झपाट्याने सुरू होईल. दुसरी गोष्ट उच्च वर्णाच्या लोकांनी आपली भावना अशी करून दिलेली आहे की, भंग्याचे काग वंशपरंपरा करणे हे आपले काम आहे व अशी मनोवृत्ती आपली झाली आहे, परंतु मी आपणाला स्पष्ट सांगतो की, आपली ही अशी मनोवृत्ती होण्याचे कारण आपली आर्थिक स्थिती होय. हल्ली भंग्याचे काम करणारांनी हे काम वंशपरंपरा करण्याचे धोरण सोडून दिले पाहिजे व त्यांना उत्तम शिक्षण दिले पाहिजे. त

आपल्या घरिस्थितीत जर काही फेरफार करावयाचे असतील तर अस्पृश्यता समूळ नाहीशी झाली पाहिजे तरच होईल, तरी आपण उच्च वर्णाच्या हिंदू लोकांच्या नादी न लागता आपला उद्धार करावयास लागले पाहिजे. असो. आपण आज मला जे मानपत्र दिले त्याबद्दल मी आपले आभार मानून माझे भाषण

संपवितो.