१३-४-१९३३ तुम्हालाच तुमची जबाबदारी ओळखणे प्राप्त आहे - Page 446

६९
तुम्हालाच तुमची जबाबदारी ओळखणे प्राप्त आहे

पूर्वी ठरल्याप्रमाणे नगर जिल्ह्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सोळंकी साहेब यांस मानपत्रे अर्पण करावयाचा आणि प्रो. राव यांचा सन्मान करावयाचा समारंभ तारीख १२ व १३ एप्रिल १९३३ रोजी मुंबई दामोदर हॉलच्या पाठीमागील पटांगणात मुद्दाम उभारलेल्या भव्य मंडपात निर्विघ्नपणे पार पडला.

पहिल्या दिवशी डॉ. सोळंकीसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांस मानपत्र अर्पण करण्यात आले.

प्रथम, रा. आर. एच. आडांगळे यांनी अध्यक्षाची सूचना आणिली व तिला रा. सू. ता. रुपवते यांनी अनुमोदन दिल्यावर डॉ. सोळंकीसाहेब यांनी अध्यक्षस्थान मंडीत केले. डॉ. सोळंकीसाहेब आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा सन्मान करणे म्हणजे तुमचा आमचाच सन्मान करण्यासारखे आहे. यानंतर रा. रोहम यांनी मानपत्र वाचून दाखविल्यावर ते सुंदर रौप्य 'करंडकातून .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांनी त्याचा स्वीकार केल्यावर ते बोलावयास उभे राहिले. ते म्हणाले,

हा आजचा समारंभ नगर जिल्हयातील मंडळीकडून साजरा करण्यात येत आहे. त्यांच्याकरिता कोणतीही स्पेशल कामगिरी मी केली नसताना फक्त माझ्यावरील त्यांच्या प्रेमामुळेच हा समारंभ घडून येत आहे, याबद्दल या मंडळीचे मी आभार मानतो. नगर जिल्हा इतर जिल्हयापेक्षा थोडा मागासलेला आहे. या जिल्ह्यातील सामाजिक परिस्थिती अडचणीची आहे हे मी जाणून आहे. या जिल्ह्यातील महार लोकांनी खिश्चन धर्माचा स्वीकार केल्यामुळे दोन पंथ झाले आहेत. असे असता या जिल्हयाकडे विशेष लक्ष पुरविणे मला शक्य झाले नाही, याबद्दल वाईट वाटते. मला नवीन असे काही सांगण्यासारखे राहिलेले नाही. तरी पण या खुर्चीवर बसल्यापासून माझ्या मनात खेदाचे प्रकार घुटमळू लागले आहेत. जमलेल्या लोकांना असे वाटत असेल की आपण पुढारी झालो असतो तर किती चांगले झाले असते ! डॉ. आंबेडकरांचे नाव बऱ्या-वाईट प्रकारे वर्तमानपत्रातून वाचावयास मिळते, तसे आपले झाले असते. माझी स्वतःची अशी प्रबळ इच्छा आहे की, माझ्या स्थानी दुसरा कोणी येईल तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. माझ्या गळ्यात हार घालणाऱ्याला आनंद झाला

जनता : २२ एप्रिल १९३३.