४१६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
त्यांना कळून येईल की त्यांची दृष्टी अटकेवर की विध्यांद्रीवर आहे ! मला हिंदू समाज व धर्म यांची पर्वा नाही. मला एवढेच पाहावयाचे आहे की माझा ज्या अस्पृश्य समाजाशी लागाबांधा आहे त्यांचे हित साधणे व तेच मी सध्या करीत आहे. तुम्हाला माझे इतकेच सांगणे आहे की, धर्म व सामाजिक बाबी दूर ठेवा आणि भाकर, शिक्षण व राज्यसत्ता मिळविण्याकडे आपल्या बुद्धीचा व्यय करा, येथे आताच सार्वजनिक विहिरी, शाळा वगैरेवर पाट्या लावण्याची याचना करणारा ठराव आणला होता. याचना करण्याचे वास्तविक कारणच नाही. म्युनिसीपालिटी व लोकल बोर्डात जर तुमचे खरे व भरपूर प्रतिनिधी असतील तर ते भांडून असे करणे भाग पाडतील. यासाठी असले प्रतिनिधी तयार करण्याकडे व निवडून देण्याकडे लक्ष ठेवा. म. गांधी देवळे उघडण्याचे उपाय शोधण्यात गुंतले आहेत. हिंदू लोक देवळे उघडोत अगर सात कुलपात बंद करोत मला त्याची पर्वा नाही. हिंदू तरुण जर्मन राजकारणाचा अभ्यास करतील तर त्यांना दिसून येईल की नाझी पक्ष कम्युनिस्टांविरुद्ध लढत आहे. एकाच राष्ट्रातील लोक न्यायासाठी एकमेकांचे रक्त सांडीत आहेत. १८६३ साली अमेरिकेत निग्रो लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी उत्तर व दक्षिणेकडील गोरे आपसात लढले, हे हिंदी तरुणांना कळत नाही. अस्पृश्यता निवारणासाठी चार हिंदू तरुणांनी चार सनातन्यांची डोकी सडकून काढली असती, तरुणांचे शिंपीभर रक्त सांडले असते तर काय बिघडले असते? परंतु येथे खरे अस्पृश्यतानिवारण कोणाला करावयाचे नाही. असो. हिंदू धर्म व समाज यांचे काहीही होवो, अस्पृश्यता निवारण केले जावो, अगर तसेच पूर्ववत राहो, तुम्ही त्याकडे आपले लक्ष गुंतवू नका. आपसातील महार-चांभार भेद नाहीसे करून एकी व संघटन वाढवून मिळालेले राजकीय हक्क जपण्याकडे आपले तन-मन-धन खर्ची घाला. इतके सागून मी आपली रजा घेतो.
| ७ ७ ७