२९-९-१९३४ गुलाम म्हणून अपमान किती दिवस सहन करणार ? - Page 472

४२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आता मात्र आपण या बिलाच्या मृत्यूवरून बोध घेतला पाहिजे. हिंदू समाजाचे मनोगत आपणास कळले आहे. तो अस्पृश्य समाजास आपला म्हणावयास तयार नाही हे आपल्याला स्पष्टपणे कळले आहे. अशारितीने हिंदुंनी तुम्हाला लाथाडल्यावर तुम्ही हिंदुंचा कासोटा किती दिवस धरून चालणार ? अस्पृश्यांस हिंदू समाजशरीराचा एक अभिन्न अवयव म्हणून समजण्यास आज कोणी तयार नाही. पायातील वहाणेचा जरूर तितका उपयोग करून घेऊन मनुष्य तीस घराच्या बाहेर ठेवतो व जरूर नसल्यास ती फेकून देतो. आज हिंदू लोक तुमची पायातील वहाणेपेक्षा अधिक किंमत समजत नाही. तुम्हाला गुलाम म्हणूनच वागवावयाचा त्यांचा कृतनिश्चय आहे. असे असता हा अपमान तुम्ही फिती दिवस सहन करणार ? तुम्ही दुसऱ्यांचे गुलाम म्हणून किती दिवस राहणार ? आजची परिस्थिती तुमच्या स्वाभिमानास पोषक आहहे का ? स्वाभिमानरहित गुलाम आपली स्वतःची किंवा देशाची कधीतरी उन्नती करू शकला आहे काय ? या प्रश्नाचा तुम्ही नीट विचार करा. आपल्यास हिंदू म्हणवून घेऊन दुसऱ्यांचे गुलामच तुम्ही राहू इच्छिता काय ? या प्रश्‍नांचा विचार करता हिंदू म्हणवून घेण्यास मांझी तरी मनोदेवता सांगत नाही.

मी आज दोन वर्षे या प्रश्‍नाचा खोल विचार करीत आहे आणि माझी पूर्ण खात्री झाली आहे की, माझा स्वाभिमान. जागृत ठेवावयाचा असेल, मला समतेच्या वातावरणात वागावयाचे असेल तर मला हिंदू म्हणवून घेता येणार नाही. मी हिंदू नाही तर मी स्वत:ला काय म्हणवून घेईन. खिश्चन म्हणेन किंवा मुसलमान म्हणेन किवा बुद्धधर्मीय म्हणेन हे मी आज सांगत नाही. आतापर्यंत हिंदू राहिलो, तुमच्याबरोबर राहिलो केवळ तुमच्याच करिता, तुमच्या अशिक्षिततेमुळे तुम्हास सोडून जाणे म्हणजे तुम्हास आंधळे करणे, हे जाणूनच मी आजपर्यंत तुमचे बरोबर राहिलो. परंतु लवकरचं आपण या गोष्टीची शहानिशा करू व जे काय करावयाचे ते सर्वजण एकदम करू. कड्यावरून उडी टाकणे झाल्यास सर्वजण एकदम उडी टाकू. ` सध्या तुम्ही आपल्या मनाशी हिंदुंचे आपल्याशी कोणत्या प्रकारचे वर्तन आहे याची खूणगाठ बांधून ठेवा

शेवटी आपण आज या ठिकाणी माझे हृद्गत बोलून दाखविण्यास संधी दिली याबद्दल आपणा सर्वाचे आभार मानून मी आपणा सर्वाची रजा घेतो. .

eee