७७
अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो, पण
हिंदू म्हणून मी मरणार नाही
' शनिवार ता. १२ ऑक्टोबर १९३५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिकला गेले, तेव्हा सकाळी ११ वाजता त्यांना स्टेशनपासून गावात मोठ्या थाटाने मिरवत नेण्यात आले. विदगाव, नाशिक रोड वगैरे ठिकाणी त्यांना मेजवानी दिल्या. नाशिक रोड येथे त्यांच्या नावे एक वाचनालय सुरू केले होते, त्याच्यासाठी एक पत्र्याची शेड बांधली होती. तिचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाषण करताना त्यांनी जनतेला उपदेश केला की,
तुम्ही स्वावलंबी व्हा. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या प्रगतीचे कार्य करा. माझे बरे वाईट झाले तर माझ्यामागे चळवळ चालविण्यास लोक तयार झाले पाहिजेत. रात्रौ नऊ वाजता रविवार पेठ, हिरालाल गल्ली येथे सहभोजन झाले. त्यात देशपांडे हे एकच काँग्रेसमन होते. रविवारी ता. १३ ऑक्टोबरला बाबासाहेब नाशिकहून विंचूरला गेले. मार्गावरील गावातून त्यांना अनेक ठिकाणी हारतुरे देण्यात आले. विंचूर येथे स्पृश्य वर्गातफही त्यांना चहापार्टी देण्यात आली. सकाळी ते येवले म्युनिसीपालिटीचे मानपत्र स्वीकारण्यास गेले. मानपत्राला उत्तर देताना ते म्हणाले की, आमच्या चळवळीमुळे स्पृश्य वर्गीयांच्या दृष्टिकोनात वदल घडेल व ते आमच्याशी आपुलकीने वागण्यास तयार होतील, असे दिसत नाही ! तेव्हा आम्ही हिंदूंमधून दूर राहून स्वावलंबनाने आमच्या प्रगतीसाठी झगडत राहू. |
दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ ला येवले (नाशिक) येथे मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषद भरली. परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. अमृतराव रणखांबे होते. परिषदेची सुरवात रात्रौ १० वाजता झाली. परिषदेला सुमारे दहा हजार जनसमुदाय होता. स्वागताध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांनी धर्मांतर करावे, अशी घोषणा करणारे भाषण केले. * १
* डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड ६ वा, पृष्ठ ८४, ८५.