अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला . . . . . . मी मरणार नाही ४३१
' येवले येथे ता. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी भरलेल्या मुंबई इलाखा परिषदेपुढे
अध्यक्षस्थानावरून भाषण करताना डॉ. आंबेडकर यांनी सवर्ण हिंदुंच्या जाचातून
मुक्तता करून घेण्यासाठी अस्पृश्यांना धर्मांतराचा जो निर्वाणीचा मार्ग सुचविला
तो पाहून प्रत्येक हिंदू अंतःकरण हालून गेल्याशिवाय खचित राहिले नसेल. केवळ
अध्यक्षीय भाषणातच ह्या मार्गाचा पुरस्कार झालेला नाही, तर सदर परिषदेनेही,
हिंदू धर्मातील अस्पृश्य गणलेल्या वर्गाने हिंदू धर्माचा त्याग करून ज्या धर्मात समानतेचे हक्क मिळतील त्या धर्मात प्रवेश करण्याविषयीचाही ठराव मंजूर करून घेऊन आपल्या अध्यक्षांचा सल्ला अनुसरण्याचे जाहीर केले. हिंदू धर्मातील ज्या अन्यायामुळे डॉ. आंबेडकरांसारख्या व्यक्तीलादेखील धर्मातर करण्यास उद्युक्त होण्याची प्रवृत्ती झाली, त्या अन्यायाच्या व हे अन्याय होण्यास कारणीभूत होत असलेल्या सनातनी म्हणविणाऱ्या लोकांच्या माणुसकीला मुकलेल्या खुनशी वृत्तीचाही त्याचवेळी विचार होणे अवश्य आहे. डॉ. आंबेडकरांच्या ह्या कृत्याचे पातक त्यांच्यापेक्षा ह्या सनातन्यांच्या शिरावर आहे हे मुळीच विसरून चालणार नाही. डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांचा हिंदूधर्मात किती अमानुषपणे छळ होत आहे; आणि ह्या छळातून मुक्तता करून घेण्याचे आतापर्यत त्यांचे प्रयत्न सवर्ण हिंदूंच्या असहिष्णू वृत्तीमुळे कसे फशी पाडले गेले आहेत, याचा समग्र पाढा आपला उपर्युक्त निर्णय जाहीर करण्यापूर्वी स्पष्टपणे वाचून दाखविला आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय या प्रत्येक बाबतीत दलित वर्गाची कुचंबणा होत आहे. हिंदू धर्माच्या दडपणाखाली मनुष्यत्वाचे साधे हक्क सुद्धा संपादन करणे अशक्य झाले आहे, त्यासाठी आजपर्यंत केलेला पराकोटीचा स्वार्थत्याग व्यर्थच ठरला आहे. गेल्या पाच वर्षात नाशिकच्या काळ्या रामाच्या देवळात प्रवेश मिळवून त्या योगाने हिंदू समाजात आपला समान हक्क व दर्जा मान्य करून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, तसेच सत्याग्रहाचा उपाय उच्चवर्णीय हिंदुंची मने वळविण्यास निरुपयोगी ठरला. या साऱ्या गोष्टींचा निर्देश करून डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात,
साधे मूलभूत हक्क आम्हाला लाभू देण्यासाठी ' स्पृश्य ' म्हणून गणल्या गेलेल्या हिंदू लोकांची मनधरणी करण्याच्या निरर्थक प्रयत्नात जे काही थोडेसे द्रव्यसाधन आम्ही जमा केले होते तेही खर्ची घालून बसलो. त्यांच्याकडून झालेली कल्पनातीत मानखंडनाही आम्ही सहन केली, पण हा सारा स्वार्थत्याग निष्फळच ठरला. निमूटपणे व धिम्मेपणे आजपर्यंत आम्ही जे जे हाल सहन केले, त्याचा यत्किंचितही परिणाम ह्या हिंदू लोकांच्या .अंतःकरणावर झालेला दिसून आला नाही. आम्ही दुसऱ्या धर्माचे अनुयायी असतो आणि त्यावेळीही आताचेच आमचे उदरनिर्वाहाचे उद्योगधंदे आम्ही पत्करीत असतो तर ह्या हिंदू लोकांना आम्हाला आताप्रमाणे अपमानकारक रीतीने जगविण्याचा किंचितही धीर
करवला असता का ?