४६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
ठराव ६ वा.--अखिल अस्पृश्य समाजाचे मुखपत्र ' जनता ' आहे. या आपल्या वर्तमानपत्राचे प्रत्येक गावच्या अस्पृश्य समाजाने वर्गणीदार व्हावे, तसेच कार्यप्रसंगी जनता पत्रास आर्थिक मदत देऊन पत्राच्या उत्कर्षासाठी व वाढ होण्यासाठी सर्व अस्पृश्य समाजाने सदैव खटपट करावी, अशी या परिषदेची सर्वांना आग्रहाची विनंती आहे. ठराव मांडणार धोंडीराम गायकवाड. अनुमोदन देणार सदाशिवराव साळवी.
ठराव ७ वा.--जर या भागातील अस्पृश्य समाज लग्नप्रसंगी काही जुन्या रूढींचे अवलंबन करीत असेल तर त्यांनी यापुढे त्या रूढींचा त्याग करावा व लग्नप्रसंगी शिक्षणासारख्या समाजहित वर्धनाचे कार्यास मदत करावी. ठराव मांडणार श्री. लक्ष्मण मानोजी गायकवाड. अनुमोदन देणार गोपाळ महादेव जाधव.
ठराव ८ वा.--येत्या मे महिन्यात मुंबई येथे अखिल महार समाजाची परिषद भरणार आहे. त्या परिषदेत या भागातील सर्व महार बंधूंनी भाग घ्यावा अशी या परिषदेची विनंती आहे. ठराव मांडणार दिवाकर पगारे. अनुमोदन देणार संभाजी बाबा गायकवाड.
ठराव ९ वा.--ही परिषद यशस्वी करण्याकरिता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सर्वांचे ही परिषद आभार मानते. ठराव मांडणार गायकवाड, अनुमोदन देणार जाधव. .
वरील सर्व ठरावांवर जोरदार उद्बोधक भाषणे झाली व सर्व ठराव टाळ्यांच्या कडकडाटात एकमताने पास झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा दोन कळकळीचे शब्द सांगितल्यावर आभार प्रदर्शनानंतर प्रचंड जयघोषात या परिषदेचे कार्य अत्यंत यशस्वी रीतीने पार पडले. परिषदेहून मंडळी परत येताना वसई स्टेशनवर नाशिकच्या महीपतराव विठूजी निळे, दामूजी नामदेव निळे, वाघूजी करडक मिस्त्री, पुलाजी उमाजी पाटारे, नानासाहेब गणोजी बोराडे, श्रावण भेरवराव वगैरे मंडळींनी बाबासाहेब आंबेडकर व परिषदेहून आलेल्या मंडळीचा मोठा गौरवपर सत्कार करून त्यांना फलाहार दिला.