२९-२३-१९३६ मत विकणे हा गुन्हा तर आहेच शिवाय तो आत्मघातही आहे - Page 511

मत विकणे हा गुन्हा तर ...... तो आत्मघातही आहे ४६७

आपणाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा जर आपण चांगल्या तऱ्हेने

उपयोग केला तर आपण चांगलीच माणसे कायदेमंडळावर निवडून आणू व

त्यापेक्षा जास्त आपली उन्नती आपण करू शकू. आपणास कोणाची निवड

कायदेमंडळावर करावयाची त्याबद्दल मी वेळेवर सांगेन.

शेवटी ही परिषद यशस्वी करण्यासाठी तुम्ही लांबलांबून येथे येण्याचे जे कष्ट घेतलेत व माझेवर जो लोभ दाखविलात त्याबद्दल मी तुमचे व या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. शिवराम गोपाळ जाधव यांचे आभार मानून आपले भाषण पुरे करतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाल्यावर खालील ठराव मांडण्यात आले. पहिले दोन ठराव अध्यक्षांनी मांडले.--

ठराव १ ला.--मरहूम बादशहा पंचम जॉर्ज यांच्या शोचनीय निधनाबद्दल या परिषदेस अत्यंत दुःख वाटत आहे.

ठराव २ रा.--बादशहा आठवे एडवर्ड यांना ही परिषद दीर्घायुरोग्य चिंतीत आहे.

ठराव ३ रा.--येवले मुक्कामी आपल्या अस्पृश्य समाजाने जी धर्मांतराची घोषणा केलेली आहे त्या घोषणेस या परिषदेचा पूर्ण पाठिंबा आहे. ठराव मांडणार लक्ष्मण जानबा गायकवाड. अनुमोदन देणार गंगाराम माधव जाधव, श्री. चांगदेव मोहिते, श्री. वनमाळी, श्री. मडकेबुवा जाधव.

ठराव ४ था.--या जिल्ह्यातील सार्वजनिक तलाव, विहिरी वगैरे पाणवठ्याचा समानतेने उपभोग घेण्याबद्दल ठाणे'डिस्ट्रीक्ट लोकल बोर्डाने आपल्या ताब्यातील पाणवठ्यावर सर्वांनी पाणी भरावे अशा पाट्या लावल्या आहेत. तरी पण बहुसंख्य स्पृश्य समाजाकडून अस्पृश्यांना त्या पाणवठ्यावर पाणी भरण्यास मज्जाव होत आहे या बाबतीत सरकारने लक्ष घालूनं अस्पृश्यांना या पाणवठ्यावरून पाणी भरण्याचे वेळी स्पृश्य समाजाकडून येणारा अडथळा दूर होईल अशी तजवीज करावी. ठराव मांडणार चांगदेव मोहिते. अनुमोदन देणार जनार्दन पद्माजी लोखंडे.

ठराव ५ वा.--अस्पृश्य व रानटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातीतील लोकांना सरकार केवळ त्यांची जात लक्षात घेऊन जेलमध्ये मलमूत्र काढण्याचे काम करावयास भाग पाडते. या व अशाच अनेक प्रकारच्या अन्यायमूलक परंपरेचा पुरस्कार करणाऱ्या सरकारबद्दल ही परिषद आपला संताप व्यक्‍त करीत आहे व हा अन्याय ताबडतोब दूर करावा. अशी सरकारकडे विनंती करीत आहे. ठराव मांडणार श्री. मोरे, अनुमोदन देणार आढाव व जाधव.