४७२ डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
आम्ही हिंदुंच्या राज्यात राहणार नाही' असे कोठे तरी म्हटले का? नाही. डोमिनियन स्टेटस किंवा होमरूल यांच्या मार्गात आम्ही कोणतेच अडथळे पसरले नाहीत. आम्ही फक्त आम्हाला संरक्षण द्या, एवढेच म्हटले. आमच्यात व इतर देशातील अल्पसंख्यांकांत हा महत्त्वाचा भेद आहे.
आता संरक्षणाबद्दल म्हणाल, तर रोमच्या साम्राज्यातही पॅट्रिशियन्स व प्लेबियन्स असे दोन भाग होते व त्यांच्या निवडणुकी स्वतंत्र मतदार संघातूनच होत असत. स्वतंत्र मतदारसंघात कोणतेही पाप नाही, त्यात कोणतेच कृष्ण कारस्थान नाही. माझे बहुसंख्य हिंदुंना एवढेच सांगणे आहे की, आता तुम्ही बहुसंख्य असल्यामुळे जी सत्ता तुमचे हाती येणार आहे तिचा न्याय्य व उदारबुद्धीने उपयोग करा. हिंदुस्थानच्या राजकीय प्रगतीची जर वाढ खुंटली, तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील. आपल्याला मिळालेले हक्क अल्पसंख्याकांचे फायद्याचे दृष्टीने तुम्ही ज्या मानाने उपयोगात आणाल त्या मानाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली की नाही, याचा निर्णय होईल. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुन्हा एकवार आपले आभार मानून, मी आपले भाषण संपवितो.
त्यानंतर रावसाहेब फुले, उपाध्यक्ष, यांनी डॉ. आंबेडकर यांचे व पाहुण्यांचे आभार मानताना, अल्पसंख्यांकांच्या मागण्याबद्दल हिंदुंची तक्रार नाही; फक्त त्यांनी स्पृश्यांशी जे धोरण स्वीकारावयाचे ते राष्ट्रीयत्वाला पोषक व जातीद्देषाला नामशेष करील, असे असावे व त्यामुळे हिंदी राष्ट्राचे जातीय तुकडे होतील, असे वर्तन ठेऊ नये, डॉ. आंबेडकरांचे वर्तुळ परिषदेतील धोरण राष्ट्रीयत्वाला पोषक होते, हे मला कबूल आहे, सर्व अल्पसंख्यांकांनी जर राष्ट्रीयतेला पोषक असे धोरण स्वीकारले, तर हिंदू समाजाला जरी कितीही स्वार्थत्याग करावा लागला तरी त्याबद्दल कोणी तक्रार करणार नाही, असे सांगितले. त्यानंतर समारंभ खलास झाला.