९-३-१९२४ सात कोटी अस्पृश्य हिमालय जमीनदोस्त करतील - Page 54

१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

योजना आखलेल्या आहेत. त्या सफल झाल्या तर अस्पृश्य समाज व स्पृश्य समाज यांचा फायदा होईल. अस्पृश्यांचे प्रश्‍न फार बिकट आहेत. ते सर्व मी सोडवू शकणार नाही, याची मला जाणीव आहे. परंतु ते सर्व प्रश्‍न जगाच्या चव्हाट्यावर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधू शकेन, एवढा मला आत्मविश्वास आहे. अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे. या हिमालयाशी टकरा मारून मी माझे डोके फोडून घेणार आहे. हिमालय कोसळला. नाही तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहून सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील व त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. आपापसात जर अशी तेढ पिकवीत राहिलात तर मग मलाच काय, पण प्रत्यक्ष परमेशवरालाही याबाबतीत काहीही करता येणार नाही.

साहेबांच्या या भाषणाचा परिणाम लोकांवर झाला. ते लोक तेव्हापासून शिवतरकरांशी सहकार्याने वागू लागले.