५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
इंग्लंडातील मजूर लोकांनी आपल्या देशातील लोकांना जे उत्तर दिले तेच उत्तर या ठिकाणी लागू पडते. याप्रमाणे भाषण झाल्यावर रा. नाईक यांचेही विचारपरिपूर्ण असे भाषण झाले. नंतर रा. भा. रा. ओक यांनी आपल्या विनोदी भाषणाने सर्वांचे आभार मानल्यावर उत्सवाच्या कार्यक्रमातील पहिला भाग समाप्त झाला. नंतर अध्यक्ष श्री. पालये शास्त्री यांच्याकडे भोजनास गेले. त्यांनी कसलाही किंतू मनात न बाळगता आपल्या घरात डॉ. आंबेडकर व त्यांच्या बरोबरीच्या अस्पृश्य मंडळीसह सहभोजन केले.
नंतर रात्री ९ ते ११-३० पर्यंत कीर्तन झाले. या कीर्तनात कसल्याच प्रकारचा जातीभेद न मानता लोक कीर्तनश्रवणास बसले होते. काही महार मंडळी तर कीर्तनी बुवांच्या समोरच बसली होती. कीर्तन आटोपल्यावर रात्री शिवाजी महाराजांची पालखी डॉ. आंबेडकर यांच्या पुढारीपणाखाली अदमासे १५ हजार लोकांसह नगर प्रदक्षिणा करून आल्यावर हा उत्सव समाप्त झाला.