९
आपला उद्धार करायला
आपणच कंबर कसली पाहिजे
मुंबई-चिराबझार येथे ता. ४ जून १९२७ रोजी रात्रौ साडे आठ वाजता बहिष्कृत वर्गाची जंगी जाहीर सभा, बहिष्कृत भारताचे संपादक डॉ. बी. आर. आंबेडकर, बार-अँट-लॉ यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. ब. हि. सभेचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत एस. एन. शिवतरकर यांनी महाड परिषदेनंतर स्पृश्य लोकांनी चालविलेल्या गुंडगिरीची इत्थंभुत माहिती सांगितली. ती ऐकून लोकांच्या मनावर खेदजनक परिणाम झाला. नंतर श्री. गंगावणे, तांबे, गिमोनकर, वीरकर, भेसनकर, वीरकर, भातकुडे यांची स्फूर्तिदायक भाषणे झाली. शेवटी, अध्यक्षांनी विचारपरिप्लुत भाषण केले. सध्या अस्पृश्य वर्गाची किती शोचनीय अवस्था आहे, हे त्यांनी लोकांना स्पष्ट शब्दात पटवून दिले. '' आपला उद्धार कराया
आपणच कंबर कसली पाहिजे. हे काम एका दोघांचे नाही. यात अनेक
लोकांनी आपल्या छातीचा कोट करून आपली माणुसकी स्पृश्य लोकांपुढे सिद्ध करून घेतली पाहिजे. या कामात अनेकांचे बळी पडतील. आपल्या पूर्वजांनी रणांगणात आपल्या मनगटातील जोर समशेरीच्या तडाख्यांनी सिद्ध केलेला आहे, आता आपण आपल्या बुद्धिवैभवाने आजच्या सामाजिक दंगलीत आपली श्रेष्ठ जागा पटकाविली पाहिजे ! è उद्गार ऐकून दोन-तीन तरूण ताडकन उठले व अस्तन्या सारून उद्गारले, “ बाबासाहेब | आपल्या झेंड्याखाली आम्ही लढावयास तयार आहोत! “ महाड-अत्याचार-निवारक फंडास स्थानिक लोकांनी २० रूपये व भातकुडे, वीरकर यांनी आपल्या स्कॉलरशिपमधून प्रत्येकी ५ रुपये प्रमाणे अध्यक्षांना अर्पण केले. याशिवाय इतरही किरकोळ रकमा मिळाल्या. नंतर हारतुरे अध्यक्षांना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात अर्पण करण्यात आले. 'बाबासाहेब आंबेडकर की जय' या गर्जनेत सभा विसर्जन पावली. |
बहिष्कृत भारत : १ जुलै १९२७.