MR/Khand_18_2 - Page 20

या खंडाचे तीन भाग कालानुक्रमे केले आहेत. पहिल्या भागात इ. स. १९२० ते १९३६ हा काळ घेतला आहे. एकूण ९६ भाषणांचे संकलन या भागात केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुतेक महत्त्वाच्या भाषणांचा अंतर्भाव त्यात आहे. विशेषत: १९२७ च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळचे भाषण, १९३० च्या गोलमेज परिषदेतील भाषण, १९३५ चे येवला येथील धर्मातर घोषणेचे भाषण व सर्वात महत्त्वाचे १९३६ चे मुंबई येथील 'मुक्ती कौन पथे' हे भाषण. या भाषणांचा समावेश या भागात केलेला आहे. आंबेडकर चळवळीची मूलभूत भूमिका व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नवसमाज नवनिर्मितीचे प्रारूप या भाषणातून आपल्याला पाहावयास मिळते. बाबासाहेबांचे विचार समजून घ्यावयाचे असल्यास या चार भाषणांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. यातील बहुतेक भाषणे लिखित स्वरूपाची असून मूलभूत विचार मांडणारी आहेत. आंबेडकर चळवळीची भूमिका व स्वरूप या भाषणांमधून स्पष्ट होते. केवळ अस्पृश्यता निर्मूलन एवढेच या चळवळीचे ध्येय कधीच नव्हते. मानवमुक्तीचा लढा म्हणून या चळवळीकडे पाहिले जाते. भेदभावाच्या पलीकडे जाणारा समाजनिमिती हा उद्देश या चळवळीचा होता व आहे, हे यातून स्पष्ट होते. एकसंध भारत निर्मितीसाठी करावयाच्या प्रक्रियेचा तो एक ऐतिहासिक लढा होता, असे म्हणावे लागेल. १९३० ला नागपूरला केलेल्या दि ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस काँग्रेस परिषदेच्या भाषणातून एकसंध भारत व राजकीय सत्ताप्राप्तीचा आपला उद्देश बाबासाहेबांनी अधोरेखित केलेला आहे. यादृष्टीनेही मराठीत उपलब्ध असलेल्या या भाषणाचे विशेष महत्त्व आहे.

या लिखित भाषणाशिवाय इतरत्र दिलेली भाषणे ही प्रसंगानुरूप आहेत. त्यात विशेषत: १९३७ च्या प्रांतीय निवडणूक प्रचाराची भाषणे आहेत. या भाषणातून भारतात येऊ पाहणारी लोकशाही पद्धतीची तोंडओळख व तिचे महत्त्व विशद केलेले दिसते. स्वतंत्र मजूर पक्ष हा सर्व श्रमजीवींचे प्रतिनिधित्व करीत असून तो या लोकशाही पद्धतीत किती महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे व एका विरोधी पक्षाची भूमिकाही सत्ताधारी पक्षाइतकीच जबाबदारीची व महत्त्वाची असते, हे लोकशाही प्रशिक्षणही त्यातून देतात. निवडणूक प्रचार हा भावी लोकशाही पद्धती स्वीकार याची मनोभूमिका बनविण्यासाठी त्यांनी

( सोळा )