४४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
पण त्यांच्या स्वार्थत्यागामुळे राष्ट्रवादाचा जय झाल्यावरही त्यांना आर्थिक व
सामाजिक समतेचा लाभ होईल काय, याचा कामगारांनी कधी विचारच केला
नाही. त्यांच्या त्यागावर जो राष्ट्रवाद जोपासला जातो तोच त्यांचा मुख्य शत्रु
बनतो, त्यांची सर्वात जास्त पिळवणूक यातच होते.
म्हणून पार्लमेंटरी लोकशाही खालीच जर कामगारांना नांदावयाचे असेल, तर
तिचा उपयोग त्यांनी स्वतःकरताच केला पाहिजे. याकरिता हिंदुस्थानात दोन
गोष्टींची जरूर आहे. केवळ आर्थिक मागण्याकरता ट्रेड युनियन्स स्थापणे
एवढेच कोते ध्येय हिंदी कामगारांनी न ठेवता शासनयंत्रणेचा ताबा घेणे हे ध्येय
पुढे ठेवले पाहिजे. म्हणून कामगारांनी आपला स्वत:चा राजकीय पक्ष स्थापला
पाहिजे. अर्थातच ट्रेड युनियन बळकट करणे हे या पक्षाचे एक काम
राहील. अशा पक्षाने कामगारांचे प्रतिनिधी म्हणून मिरविणाऱ्या कार्यकर्त्यांची
मक्तेदारी फेटाळली पाहिजे व फक्त थोड्याश्या तात्पुरत्या फायद्याकरता अंतिम
ध्येयाला बाध आणण्याची प्रवृती सोडून दिली पाहिजे. त्याचप्रमाणे हिंदु महासभा किंवा काँग्रेस यासारख्या जातीय व भांडवलदारी राजकीय पक्षांपासून त्याने अलिप्त राहिले पाहिजे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याकरता आम्ही लढतो, असा आव जरी हे पक्ष आणीत असले तरी त्याला न भुलता त्यांच्यापासून वेगळे राहिले पाहिजे. काँग्रेस व हिंदू महासभा यांच्या तावडीतून सुटल्यामुळे कामगारांना हिदी स्वातंत्र्याच्या लढ्यात जास्त हिरिरीने भाग घेता येईल आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली चाललेली फसवणूकही थांबवता येईल. पण याला मार्ग एकच. स्वतःचा राजकीय पक्ष स्थापणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही, की हिंदी राजकारणातील बुद्धिवादाचा अभाव त्यामुळे कमी होईल, आपले राजकारण क्रांतिवादी आहे असा काँग्रेस टेंभा मिरविते म्हणून काही लोक तिच्या मागे जातात हे खरे, पण तिच्या पदरी अपयशाशिवाय काहीच पडत नाही हेही तितकेच खरे. त्याचे कारण काँग्रेसला प्रतिस्पर्धी नसल्यामुळे तिच्यात बुद्धिवाद कधी आलाच नाही. गेल्या वीस वर्षातील ही उणीव कामगारांच्या पक्षामुळे भरून निघेल.
हिंदी कामगारांनी दुसरीही एक गोष्ट शिकायला हवी. ती म्हणजे ही. की ज्ञानावाचून सामर्थ्य नाही. आपला प्रश्न घेऊन कामगार जेव्हा लोकांपुढे उभे राहातील तेव्हा हा प्रश्न नक्की विचारला जाईल की, ' राज्य करण्याची त्यांची