२०३
समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून
आपली शक्ती वाढवा
अखिल भारतीय समता सैनिक दलाचे दुसरे अधिवेशन रविवार,
ता. ३० जानेवारी १९४४ रोजी सकाळी कानपूर येथे झाले. अध्यक्षस्थानी
श्री. बी. के. गायकवाड हे होते. परिषदेस मुंबई, महाराष्ट्र, मध्यप्रांत, गुजरात,
पंजाब, बंगाल, मद्रास, संयुक्तप्रांत, तसेच हैद्राबाद, ग्वाल्हेर, कोल्हापूर, इंदूर,
उज्जैन वगैरे संस्थानांतून शेकडो प्रतिनिधी आले होते. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर, श्री. शिवराज, जनरल सेक्रेटरी श्री.पी.एन. राजभोज, प्यारेलाल कुरील
तलीब इत्यादी पुढाऱ्यांची भाषणे झाली.
प्रथम श्री. आर. आर. पाटील (नागपूर) यांनी मुंबई व नागपूर येथील समता
सैनिक दलांनी गेल्या वर्षात केलेल्या कामगिरीचा अहवाल वाचून दाखविला.
नंतर परिषदेचे अध्यक्ष, श्री. भाऊराव गायकवाड यांचे भाषण झाले. त्यानंतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या
भाषणात म्हणाले,
माझ्या समता सैनिक दलाच्या शूर सैनिकांनो,
आज या संयुक्त प्रांतात दलाचे दुसरे अधिवेशन भरले आहे. गेल्या १७ वर्षापासून या दलाचे कार्य मुंबई व मध्यप्रांत येथे मोठ्या जोराने चालले आहे. या दोन्ही प्रांतात दहा हजारांवर समता सैनिक दलाचे श्रेष्ठ सैनिक उभे आहेत. माझ्या मुंबई प्रांतात काही वर्षापूर्वी आपल्या किंवा इतर पक्षांची जाहीर सभा काँग्रेसचे गुंड उधळून लावीत असत. १९२७ साली या दलाची स्थापना माझे हस्ते करण्यात आली. त्या दिवसापासून आमच्या सभेत काँग्रेसचा गुंड अथवा एखादा मवाली शिरण्याची ताकद नाही. एकदा माझ्या ऑफिससमोर विरोधी पक्षाची मोठी जाहीर सभा भरली होती. त्या सभेत आपले सैनिक गेले आणि त्यांनी ती सभा व सभेतील दिवाबत्ती, टेबल, खूर्ची वगैरे काबीज करून माझ्या ऑफिसमध्ये आणून टाकली. ते सामान अद्याप माझ्याकडे तसेच आहे. या वस्तू म्हणजे आपल्या या सैनिकांच्या कार्याचे द्योतक आहे.
जनता : ६ जानेवारी १९४५.