समता सैनिक दलाच्या शाखा सर्वत्र स्थापून आपली शक्ती वाढवा ४४३
सांगण्याचा उद्देश एवढाच की आपले सैनिक इतके तडफदार आहेत. ते मनात आणतील तर त्यांच्यावर सोपविलेले कार्य चुटकीसरशी करून दाखवितील इतका मला त्यांच्याविषयी विश्वास वाटत आहे. म्हणून या ध्येयवादी दलाच्या शाखा प्रांतोप्रांती, शहरोशहरी, खेडोपाडी स्थापून शक्ती वाढविली पाहिजे.
यानंतर श्री. प्यारेलाल कुरील तलीब, एम्. एल्. ए. (सेंट्रल असेंब्ली), यांचे भाषण झाले. ते म्हणाले, आताच डॉ. बाबासाहेब, यांनी जे भाषण केले त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व मी माझ्या संयुक्त प्रांतात येत्या अधिवेशनापूर्वी दहा हजारावर सैनिक तयार करून ठेवितो.” श्री. पी. एन्. राजभोज व इतर वक्त्यांच्या भाषणानंतर या परिषदेत पुढील ठराव पास करण्यात आले.
ठराव नं. १.--देशाच्या निरनिराळया भागात अस्तित्त्वात असलेल्या अस्पृश्य वर्गाच्या सर्व स्वयंसेवक संघांना एकजूट करण्याबद्दल व समता सैनिक दल या अखिल भारतीय सैनिक दलात सामील होण्याबद्दल या परिषदेची विनंती
आहे.
ठराव नं. २.--अखिल भारतीय दलित वर्ग फेडरेशनच्या निरनिराळ्या घटकांनी आपापल्या हद्दीत समता सैनिक दलाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी स्वयंसेवक पथके स्थापन करून त्यांची संघटना करावी, असे आपले पूर्ण विचारांती निश्चित मत झाले आहे, असे ही परिषद जाहीर करते.
ठराव नं. ३.--अखिल भारतीय दलित फेडरेशनच्या सर्व घटकांनी आपापल्या
स्वयंसेवकांना जरूर ते शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक केंद्रे व छावण्या उघडाव्या
अशी या परिषदेची विनंती आहे.
ठराव नं. ४.--भारत संरक्षण कायद्यान्वये स्वयंसेवक संस्थांवर लादण्यात
आलेले निर्बध अनिष्ट व असमर्थनीय आहेत, असे या परिषदेचे निश्चित मत
आहे. "समता सैनिक दल' या सारख्या फॅसिस्ट विरोधी स्वयंसेवक संस्थेच्या
वाढीला या निर्बधामुळे निष्कारण व्यत्यय येतो. म्हणून हे निर्बंध ताबडतोब रद्द
करण्यात यावेत, अशी या परिषदेची मागणी आहे.
ठराव नं. ५.--अखिल भारतीय दलित फेडरेशनने नुकत्याच भरलेल्या
अधिवेशनात जे ठराव संमत केले त्या सर्व ठरावांना या परिषदेची मान्यता
आहे.