२२-९-१९४४ तर त्या स्वातंत्र्यासाठी मी केव्हाही लढावयास तयार आहे - Page 495

२०७

तर त्या स्वातंत्र्यासाठी मी केव्हाही
लढावयास तयार आहे

शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर १९४४ ला सायंकाळी मद्रास म्युनिसीपल कार्पोरेशन तर्फे चांदीच्या करंड्यातून मेयर डॉ. सय्यद नियामथुल्ला यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र अर्पण करण्याचा जंगी समारंभ रिपन बिहिंडग मध्ये झाला. या समारंभात अनेक प्रतिष्ठित नागरिक, सरकारी अधिकारी आणि कार्पोरेटर्स उपस्थित होते. काँग्रेसपक्षीय कार्पोरेटर्सनी मानपत्राला विरोध केलेला होता व म्हणून ते समारंभाला उपस्थित राहिले नव्हते.

मानपत्रास उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

आपल्या शहरातर्फे आपण माझे स्वागत करीत आहात, हा आपला मोठेपणा आहे. मी मद्रास शहराचा रहिवासी नाही आणि नागरिक जीवनातही मी काही विशेष कधी केले नाही. म्हणून आपल्या पाहुणचारावर माझा तसा काहीच हक्क नाही. असे असूनही आपण माझे स्वागत करीत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कोणावरही टीका करण्याच्या किंवा कुरापत काढण्याच्या उद्देशाने मी ही पुढील गोष्ट काढीत नाही. तर एक घडलेली सत्य गोष्ट म्हणून उल्लेख

करतो. मी वर्तमानपत्रात वाचले की मला मानपत्र देण्याचा ठराव सर्वानुमते पास

झाला नाही. त्यास काही लोकांनी विरोधही केला (हंशा) याचा उल्लेख

करण्याचे कारण एवढेच की सर्वानुमते संमत होऊन मानपत्र मिळण्यापेक्षा ते अशा

रितीने मिळालेलेच मला पत्करते. सर्वानुमते होणाऱ्या बन्याच गोष्टी आपण

केवळ औपचारिक म्हणून करतो व आधुनिक समाजातील काही परंपरागत खोट्या

रूढी ह्यापलीकडे त्याचा काही अर्थ नसतो (टाळया). झाली ही गोष्ट एवढे तरी

नककी दाखविते की कार्पोरेशनच्या एका तरी भागाने मला मानपत्र देण्यात

प्रामाणिकपणा व आग्रह दाखविला.

माझ्या युनिव्हर्सिटीतील आयुष्याचा आणि शिक्षक, वकील व मुंबईच्या वरिष्ठ

कायदेमंडळाचा सभासद या नात्याने माझ्या कार्याचा आपण चांगल्या पण अंमळ

अतिशयोक्तीपूर्ण शब्दात उल्लेख केला आहे. आपण माझ्याविषयी जे म्हटलेले

आहे ते सर्व खरे समजण्याइतका गर्व मला चढलेला नाही. ज्या उद्दिष्टासाठी मी

एवढेदिवस खपत आहे त्याच्या सहानुभूतीमुळेच आपण माझा गौरव केला आहे.

जनता : २५ नोव्हेंबर १९४४.