४८४ डॉ. बाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे
सत्ता गेल्यामुळे ब्राह्मणांनी पुन्हा चातुर्वर्ण्य पद्धतीचा पाया घालून भगवदगीतेच्याद्वारे
ते काम केले व देशाची आपल्या हातून गेलेली सत्ता पुन्हा परत आपल्या हातात
आणली.
वर्णाश्रम धर्माचा गीतेपूर्वी काय पाया होता तो जैमिनीने आपल्या पूर्वमीमांसा
ग्रंथात दिला आहे. वेदावर बुद्धानेच नव्हे तर चार्वाक वगैरे विद्वानांनीही टीका
केलेली आहे. बुद्धाच्या वेदावरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा सेवाधर्म जावून ते
राज्यकर्ते झाले.
सांख्य तत्त्वज्ञानावर श्रीकृष्णाने चातुर्वर्णाची चौकट निर्माण केली. सांख्यकारांनी
त्रिगुणाला मान्यता दिलेली आहे आणि गीताकारांनी चार गुण, चार वर्ण यांची
सांगड घातलेली आहे. आतापर्यंत एकाही विद्वानाने सांख्यकारांच्या व
गीताकारांच्या या तफावतीचा मेळ बसविलेला नाही. श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेने
चातुर्वर्णास आधार दिला म्हणूनच आज चातुर्वर्ण्य टिकून राहिला आहे.
भगवदूगीतेचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करताना मला या पुस्तकात चार
ठिगळे बसविल्याचे आढळून आले. माझे मत असे आहे की प्रथम हा एक कृष्ण
वर्णनाचा त्याच्या जातभाईंनी म्हणजे सातवतानी गवळ्यांनी, अर्जून हतवीर्य झाला
असताना कृष्णाने त्याला युद्धप्रवण केले म्हणून कृष्णाचे गुणगान करण्यासाठी रचलेला पोवाड। होता. त्यात धर्म अगर तत्त्वज्ञान नव्हते. त्यावेळी त्यात फक्त
६० श्लोक असावेत. नंतर हे लोक जेव्हा कृष्णाला ईश्वर मानू लागले त्यावेळी त्यांनी गायिलेली स्तुती म्हणजे भक्तिमार्ग झाला व अशारीतीने कृष्णाला देव बनविला. नंतर पुढे गीतेचे असेच रूपांतर होऊन ती आजच्या स्वरूपात आली, यात मला कोणाला दोष द्यावयाचा नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही हे ग्रंथ प्रमाण म्हणून मानाल तोपर्यंत जगात तुमचा उद्धार होणार नाही. या पुस्तकातून शूद्रांची निंदा व अवहेलना करण्यात आली आहे. त्यांच्यावर निरनिराळे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल, ते कायमचे दलित राहतील, अशी योजना करण्यात आली आहे. ती पुस्तके जर तुम्ही आम्हाला धर्मग्रंथ म्हणून प्रमाणभूत माना अशी सक्ती करीत असाल तर ते मी कधीही मान्य करणार नाही. हे माझे एक जीवन कार्य आहे. स्वतः समजावून घेऊन ते मला माझ्या लोकांना समजावून द्यावयाचे आहे. खालच्या वर्गातील लोकांना निःसंतान करण्याचा, त्यांना कायमचे पायदळी ठेवण्याचा व त्यांना रसातळाला नेण्याकरिता पद्धतशीर प्रयत्न करणारा असा एखादा विशिष्ट वर्ग जगातील इतर कोणत्याही देशात आढळणार नाही.
७ ००