३० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
संख्येने मोठा असलेल्या पक्षापेक्षा शिस्त, संघटना व उज्ज्वल ध्येयाची जाणीव असलेला अल्पसंख्यांक लोकांचा लहानसा पक्ष शेवटी राजकीय क्षेत्रात खरा प्रभावी ठरून यशस्वी होतो. आपला स्वतंत्र मजूर पक्ष आज दिसायला लहान असा पक्ष आहे. परंतु आपण आखलेल्या ध्येयमुक्त कार्याची रुपरेषा ही इतकी उज्ज्वल अशी आहे की, त्यात आपणास पुढेमागे अपूर्व यश मिळाल्याशिवाय राहाणार नाही.
मुंबई असेंब्लीतील स्वतंत्र मजूर पक्षाच्या आमदारांनी या गोष्टींना प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी शिस्त व संघटना या बाबी आपल्या पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येक सभासदांच्या हृदयावर पूर्णपणे बिंबविण्याचाही प्रयत्न करावयास पाहिजे. बहुजन समाजाशी समरस होण्याचा आपल्या पक्षाचा कार्यक्रम आहे. गोरगरीब, कामकरी व शेतकरी वर्गाचे हितरक्षण करणे हे आपल्या पक्षाचे पहिले कार्य आहे. ते कार्य करण्यासाठी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची शिस्तीने संघटना वाढून आपल्या ध्येयाचा मार्ग आक्रमण करण्याचा आजच संकल्प करावा. निःस्वार्थवृत्तीने केलेल्या कार्यात आपणास खात्रीने यश मिळेल यात बिलकूल शंका नाही.
७ ७ ७