३१-७-१९३७ साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाइट - Page 69

१०३
साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ता. ३१ जुले १९३७ रोजी धुळे येथे काही कोर्टाच्या कामाकरिता जावयाचे होते. ते शुक्रवारी रात्रीच्या गाडीने येथून निघाले. त्यांची गाडी ता. ३१ रोजी सकाळी ५ वाजता चाळीसगाव येथे आली. डॉ. बाबासाहेब चाळीसगावाहून धुळे येथे जाणार ही बातमी ऐकून हजारो अस्पृश्य बंधुभगिनी त्यांचे हार्दिक स्वागत करण्याकरिता मोठ्या पहाटे पासून चाळीसगाव स्टेशनवर येऊन हजर होती. अगदी अवचित सर्व स्टेशन स्त्रीपुरुष व मुलांनी फुलून ते डॉ. आंबेडकर साहेबांचा सारखा जयघोष करीत

तेथे उभे होते.

गाडी बरोबर ५ वाजता स्टेशनमध्ये आली. डॉक्टरसाहेब हास्यवदन करीत गाडीतून उतरताच ' आंबेडकर झिंदाबाद ' असा त्रिवार प्रचंड जयघोष झाला. आरंभी मे. एस. एस. कर्णिक, चीफ ऑफीसर व अस्पृश्योद्धारक बोर्डिंग बिल्डिंग फंड कमिटीचे सेक्रेटरी व मे. चव्हाण यांनी त्यांची मुलाखत घेतली. नंतर श्री. दिवाण चव्हाण यांच्या बोडिंगतफ आणलेला हार श्री. डी. जी. जाधव, बी.ए., एम.एल.ए. यांनी डॉक्टरसाहेबांच्या गळ्यात घातला. त्यानंतर रांजणगाव तेथील भगिनी श्रीमती सखुबाई कन्नडकर, सोनाबाई कन्नडकर, सावित्रीबाई अहिरे वगैरे भगिनींनी त्यांची पंचारती केली व त्यांना वंदन केले. वेडाबाई सरदार, शांताबाई चव्हाण, शांताबाई जाधव यांनी विद्यार्थी वर्गातर्फे हार अर्पण केले. डॉ. बाबासाहेब अस्पृश्योद्धारक बोडिंग पहावयास येतील असे कित्येकांना वाटल्यावरून बराच मोठा समुदाय बोडिंगाच्या आवारात जमा झाला होता. म्हणून श्री. शामराव कामाजी जाधव व श्रावण धर्मा जाधव यांनी त्यांना विनंती केली, परंतु वेळेच्या अभावी रात्रौ ८-३० वाजता येण्याचे त्यांनी नंतर कबूल केले. त्यामुळे बोर्डिंगमध्ये जमलेला जनसमुदाय त्यांचा गगनभेदी जयजयकार करीत स्टेशनवर आला. अस्पृश्य लोकांचे ड्ॉक्टरसाहेबांवरील अलौकिक प्रेम व त्यांच्या कामगिरीविषयीचा उत्साह पाहून चाळीसगाव येथील स्पृश्य जनतेने आश्चर्याने तोंडात बोटेच घातली. त्यांच्या दर्शनसुखासाठी अस्पृश्य बांधवांचा हा अपूर्व उत्साह कौतुकास्पद नाही असे कोण

जनता : ७ आणि १४ ऑगस्ट १९३७.