२४८
मला कर्तृत्ववान माणसे पाहिजेत, त्यांच्या
कर्तत्त्वाबद्दल माझी खात्री झाली पाहिजे
मुंबई, तारीख २२ जून १९४७ रोजी सिद्धार्थ कॉलेजच्या पटांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली श्री. दादासाहेब गायकवाड यांना थैली अर्पण करण्यात आली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब म्हणाले,
मला दादासाहेब गायकवाड यांना देत असलेल्या रकमेचा आकडा पाहून संताप आला आहे. मला जर आधी हे कळतं , तर मी आलोच नसतो. ह्याच ठिकाणी जर पैसा गोळा केला तर एक हजार सहज मिळतील, ३५२ रुपये देणे ही शरमेची गोष्ट आहे. समाजाचे कृतज्ञतेस हे शोभणारे नाही. काय द्यायचे ते योग्यरितीने द्या. हा जबरदस्तीचा व्यवहार तुम्हाला कुणी सांगितला ? द्यायचे असेल तर त्या माणसाची किंमत राहिली पाहिजे.
कोकणी पंचायतीबद्दल बोलताना त्यांनी पंचायतीना चांगलेच खडसावले आणि इतःपर कुणी पंचायतीने निष्कारण पैसा ठेवला तर त्याला कोर्टात खेचिन. ही दुष्ट खोड मोडण्यासाठी असला जालीम उपाय योजलाच पाहिजे.
मला कर्तृत्ववान माणसे पाहिजेत. त्यांचे कर्तृत्ववानपणाबद्दल माझी खात्री झाली पाहिजे. ज्यांचे सेक्रेटरीवर आरोप असतील त्यांनी मला तशी खात्री पटवून द्यावी, मी त्यांना त्या जागा देईन. मला काम प्यारे आहे. इलेक्शन प्यारे नाही. मला कर्तृत्ववान लोक हवेत.
आपला कोकण प्रांत शिक्षणाचे बाबतीत मागासला आहे. तेव्हा त्याची तरतूद करण्याचा माझा विचार चालू आहे. मुंबई सरकारकडे जमिनीसाठी मागणी केली आहे. दापोलीमध्ये मुलांचे शिक्षणासाठी बोडींग उघडणार आहे, तरी त्यांना आपण सक्रिय मदत करावी. २० हजार रुपये या कामासाठी लागणार आहेत.
गरुड : २९ जून १९४७.