२५१
अल्पसंख्यांकांची समजूत घातलीच पाहिजे
त्यांच्यावर जुलमी अधिकार चालवता कामा नये
हिंदुस्थान सरकारचे कायदेमंत्री व भारतीय अस्पृश्यांचे थोर पुढारी डॉ. बाबासाहेब आबेडकर नुकतेच मुंबईस येऊन गेले. त्या मुक्कामात त्यांचे सिद्धार्थ कॉलेजमध्ये दिनांक १० ऑक्टोबर १९४७ रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे बहुमोल व उपदेशपर असे विद्दत्ताप्रचुर भाषण झाले. ते म्हणाले,
अध्यक्ष महाराज आणि सभागृह सदस्यहो,
ह्या महत्वाच्या प्रसंगाला साजेसे भाषण तयार करण्यासाठी मला जितका [वेळ ] द्यावयास. पाहिजे होता तितका देणे मला जवळ जवळ अशक्य झाले याबद्दल मला वाईट वाटते. कारण आजची ही वेळ आपल्या देशाच्या राजकीय जीवनातील
महत्वाची आहे.
आतापर्यंत जरी आपल्यातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग राजकीय चळवळीत लक्ष घालीत असलेला दिसला तरी त्याला राजकारण म्हणजे काय, त्यासाठी कोणत्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात आणि राजकीय घडामोडी यशस्वी करण्यासाठी कोणते मार्ग चोखाळावे लागतात याची निश्चित जाणीव नव्हती, विशवविद्यालयीन जीवनाची आणि आयुष्यातील खऱ्याखुऱ्या प्रश्नांची व राजकारणाची मी वर म्हटल्याप्रमाणे फारकत होती आणि जेव्हा मी, आपण एका नवीन दालनात प्रवेश केला आहे असे म्हणता त्यावेळीच तुम्ही माझ्या सुचनेनुसार ह्या कॉलेजातील विद्यार्थ्याचे पार्लमेंट स्थापन केले असून तुम्हाला त्याद्वारे पुढील गोष्टी करावयाच्या _ आहेत हा अर्थ माझ्या मनात अभिप्रेत असतो.
(१) तुमच्या मनाचा विकास करणे, तुमचे ध्येय विस्तृत करणे, तुमची विचार करण्याची पात्रता वाढवणे व कठीण प्रश्नांचा उलगडा करण्याची तुमची ताकद वाढवणे. |
(२) अशी ही तुम्हाला लाभलेली तुमची शक्ती, पात्रता, तुमचे ध्येय, तुमची ताकद यांचा उपयोग ह्या देशातील अफाट जनतेला आज जे प्रश्न भेडसावीत आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी खर्च करणे.
गरुड : २६ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबर १९४७.