१९८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
महाराष्ट्राची उज्ज्वल अशी परंपरा आहे व ती राखण्यात विद्याव्यासंग ठेवणे आवश्यक आहे. हा वर्ग अत्यंत अभिमानीही आहे. अभिमानी असणे वाईट नाही. परंतु फाजील अभिमानी असणे बरे नसते व खरा अभिमान पूर्ण विद्येनेच येतो. माझे तुम्हा सर्वांना असे सांगणे आहे की महाराष्ट्राची परंपरा राखावयाची असल्यास आपला विद्याव्यासंग सोडता कामा नये व ज्या गुणांमुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू त्यांचे संगोपन व पालन केले पाहिजे. ते गुण म्हणजे प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व ती पार पाडताना राष्ट्रीय हिताची दृष्टी, हे होत. एक गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे व ती म्हणजे उत्तम वक्तृत्व ! प्रत्येक तरुणाने ही कला उत्तमपणे आत्मसात न केल्यास यापुढील प्रजातंत्र राज्यपद्धतीत त्यांचा टिकाव लागणार नाही. आपण मला येथे बोलावून माझा जो सन्मान केलात त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.